प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करणारी आणि अनेकांच्या पंखात बळ निर्माण करणारी जगातील पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा यांना ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख रक्कम दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता नरिमन पॉइन्ट येथील चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत कार्यातून श्रेष्ठ मापदंड प्रस्थापित केल्याबद्दल हा सन्मान दिला जातो. कृत्रिम पायाच्या आधारे अरुनिमाने एव्हरेस्ट शिखर सर करून अनेकांना प्रेरणा दिल्याने हा पुरस्कार अरुणिमा यांना दिला जात असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. १ एप्रिल २०१३ रोजी अरुणिमाने ५२ दिवस अनेक अडचणींवर मात करून एव्हरेस्ट गाठले. सर्वसाधारणपणे अपंगत्व आल्यानंतर जगण्याची आणि आजुबाजूच्यांची त्याला जगवण्याची धडपड सुरू होते. यात अनेकदा आत्मसन्मानाला तडा जातो. मात्र जिद्द, चिकाटी वृत्तीमुळे अरुनिमा यांनी एक नवे परिमाण दिले असल्याने त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.