आर्यन खानला जामीन मिळूनही आजची रात्र तुरुंगातच जाणार, जाणून घ्या काय आहे कारण!

आर्यन खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे, मात्र त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

Aryan-khan-266666

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज आर्यन खान आणि त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील आर्यन खानला आज तुरुंगातच राहावं लागणार आहे. आर्यन खानची बाजू उच्च न्यायालयात मांडणारे वकील मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत आर्यन खान तुरुंगाबाहेर येऊ शकतो.

काय आहे कारण?

आर्यन खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत आणि त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट उद्या हाती येणार आहेत. ते जेल प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खानची सुटका होऊ शकणार आहे. आत्ताच जामीन मंजूर झाल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असल्यामुळे ही कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो.

तुरुंगाबाहेरच्या पेट्यांची वेळ!

दरम्यान, कोणत्याही आरोपीच्या जामीन अर्जावर निर्णय आला आणि त्या आरोपीला जामीन मंजूर झाला, तर त्यासंदर्भातला कोर्टातला आदेश आणि ऑपरेटिव्ह जेलबाहेर लावण्यात आलेल्या पेटीमध्ये टाकावे लागतात. जेलबाहेरच्या या पेट्या रोज सकाळी साधारणपणे ८ वाजता आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उघडतात. आजची ही वेळ गेल्यामुळे आता उद्या सविस्तर निकालाची प्रत आणि कागदपत्र हाती आल्यानंतर ते तुरुंग प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खान बाहेर येऊ शकणार आहे.

काय म्हणाले मुकुल रोहतगी?

मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानसाठी माजी केंद्रीय अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडत होते. न्यायालयाच्या निर्देशांनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना जामीन मंजूर केला आहे. सविस्तर ऑर्डर उद्या हातात येईल. मला आशा आहे की हे तिघे उद्या किंवा शनिवारपर्यंत बाहेर येतील”, असं ते म्हणाले.

उद्याही मुक्काम वाढण्याची शक्यता?

दरम्यान, उद्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळणार असल्यामुळे उद्याच त्याची तुरुंगातून सुटका होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी प्रतिक्रिया देताना शनिवारचा देखील उल्लेख केला. उद्या कागदपत्र मिळण्यात किंवा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागला, तर उद्याऐवजी आर्यन खानची सुटका शनिवारपर्यंत लांबू शकते, असं सांगितलं जात आहे.

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

एनसीबीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

अनिल सिंग म्हणाले, “आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”

“आरोपींचे वकील ड्रग्ज सेवन केलं होतं की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद करत आहेत. मात्र, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचं आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलीय. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो,” असं अनिल सिंग म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan bail granted by mumbai high court advocate said stay in jail today pmw

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या