गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चा सुरू आहे ती ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची. कारण हे नाव साधंसुधं नसून बॉलिवुडचा किंग खान अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शाहरूख खानचा आर्यन हा मुलगा आहे. पण कार्डेलिया क्रूजवर एनसीबीनं टाकलेल्या छाप्यामध्ये आर्यन खानला ड्रग्ससह अटक करण्यात आल्याचं एनसीबीनं जाहीर केलं आणि खळबळ उडाली. २३ वर्षांच्या आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याला आधी एक दिवस कोठडीत ठेवलं होतं. त्यानंतर ४ ऑक्टोबरला त्याची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आज आर्यन खानची एनसीबी कोठडी संपत आहे. मात्र, काल रात्री उशिरा एनसीबीनं मुंबईतून एका विदेशी ड्रग पेडलरला अटक केल्यानंतर आर्यन खानची कोठडी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

वांद्र्यातून विदेशी ड्रग्ज पेडलरला अटक

बुधवारी रात्री एनसीबीनं मुंबईत कारवाई करत एका विदेशी ड्रग पेडलरला अटक केली. मुंबईच्या वांद्रे परिसरातून या ड्रग पेडलरला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर एमडी नावाचं ड्रग्ज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या चौकशीसाठी एनसीबीकडून आर्यन खानच्या अतिरिक्त कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. आज दुपारी यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

पुन्हा जामिनासाठी अर्ज करणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अटक करण्यात आलेल्या विदेशी ड्रग पेडलरचा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांच्याशी नियमित संपर्क होता. त्यामुळे या संबंधात आर्यन खानची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनसीबी अतिरिक्त कोठडी मागण्याची शक्यता गृहीत धरून आर्यन खानची केस लढणारे वकील सतीष मानेशिंदे हे आज पुन्हा आर्यनसाठी जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Rave Party: धाड बनावट असल्याच्या नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

एनसीबीच्या कारवाईच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह?

दरम्यान, एकीकडे आर्यन खानची चौकशी आणि कोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे एनसीबीनं टाकलेली ही संपूर्ण धाडच बनावट असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तर त्याला उत्तर देताना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी “आम्ही आधीच पत्रकार परिषद घेतली आहे, तरीही मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही पंचनामा करणाऱ्या नऊ जणांचं नाव दिलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व कारवाई करण्यात आली आहे,” असं स्पष्टीकरण दिलं आहे.