‘अ हिस्ट्री फॉर टुडे’ प्रदर्शन आजपासून मुंबईत

‘मी आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांनी कधीच घाबरत नाही. त्यापेक्षा भविष्यात येणाऱ्या चांगल्या सुखद प्रसंगांचा विचार करते,’ असे म्हणणारी अ‍ॅन फ्रँक तिच्या ‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’मधून आजवर वाचकांना भेटत आली आहे. त्यामुळे तिचा जीवनप्रवास शब्दातून जाणून घेता आला. परंतु अ‍ॅनचा जीवनप्रवास आता कलात्मक पद्धतीने प्रदर्शनाच्या रूपात जाणून घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

‘अ‍ॅन फ्रँक – अ हिस्ट्री फॉर टुडे’ नावाचे फिरते प्रदर्शन कफ परेड, मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान मुंबईकर साहित्य-कलारसिकांना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८.३० ते ४.३० या वेळात आणि इतरांसाठी सायकांळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात ३२ छायाचित्र विभागांमध्ये अ‍ॅनाचा जीवनपट पाहता येणार आहे. त्याचबरोबर काही ध्वनिचित्रफितींचाही या प्रदर्शनात समावेश आहे. ध्वनिचित्रफितीमध्ये अ‍ॅनचे वडील ओटो फ्रँक, नातेवाईक आणि काही इतिहासकार यांचे फ्रँकविषयी विचार, आठवणी, तिच्या आयुष्यातील काही घटना-प्रसंग दृश्यमाध्यमात पाहायला मिळतील.

अ‍ॅन फ्रँक – अ हिस्ट्री फॉर टुडे’ नावाचे हे फिरते प्रदर्शन आजवर ५० देशांमध्ये जाऊन आले आहे. भारतात ते पहिल्यांदा २०१३ मध्ये आले होते.

युद्धजन्य परिस्थितीत कलाच माणसाला तारते, युद्धावर शांतता हाच उपाय आहे, असा प्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश देण्यात आलेला आहे, तसेच मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या आजच्या काळातील पार्श्वभूमीवर या प्रदर्शनातून बरेच काही हाती लागेल, असे या प्रदर्शनाचे आयोजक ‘पीसवर्क्‍स’च्या वतीने सांगण्यात आले.

प्रथमच मुंबईत

‘अ‍ॅन फ्रँक – अ हिस्ट्री फॉर टुडे’ नावाचे हे फिरते प्रदर्शन आजवर ५० देशांमध्ये जाऊन आले आहे. भारतात ते पहिल्यांदा २०१३ मध्ये आले होते. त्यावेळी कोलकाता, पुणे, नाशिक, पटना, लुधियाना आणि बेंगळूरुमधील साहित्य-कलारसिकांना ते पाहायला मिळाले होते. आता मात्र २०१८मध्ये मुंबईमध्ये ते पहिल्यांदाच येत असून ‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’ या पुस्तकातून न उलगडलेल्या अ‍ॅनच्या जीवनप्रवासातील काही ऐतिहासिक घटना या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.