मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा घरोघरी पोहचविणाऱ्या आशा सेविकांना मिळणारे मानधन कामानुसार दुप्पट करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच आरोग्य सेविकांना मानधनाव्यतिरिक्त कामानुसार मोबदला देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आशा सेविकांचे मासिक वेतन जवळपास दहा हजार रुपये तर आरोग्य सेविकांचे १५ हजार रुपये होईल.
हिवताप, डेंग्यू, लेप्टो अशा पावसाळी आजारांचे सर्वेक्षण, बालकांचे लसीकरण, गरोदर मातांच्या तपासण्या अशी विविध कामे विभागात फिरून करणाऱ्या आशा सेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानानुसार प्रत्येक कामानुसार मोबदला दिला जातो. त्यामुळे जितके काम जास्त तितकाच अधिक मोबदला असे स्वरुप आहे. शहरामध्ये आरोग्याची कामे झोपडपट्टी भागांमध्ये मर्यादित असल्यामुळे शहरातील आशा सेविकांना तुलनेने मोबदला कमी मिळतो. या आशांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे काम जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता आशा सेविकांचे कामानुसार मिळणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. उदाहरणार्थ, आशांना घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी १०० रुपये दिले जातात. आता यामध्ये वाढ करून २०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे आशा सेविकांना महिन्याकाठी मिळणाऱ्या मानधनामध्ये दुपटीने वाढ होणार आहे.
एका कामासाठी दुप्पट मोबदला –
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून आशा सेविकांना प्रत्येक कामानुसार मिळणारा मोबदला राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे. आता याच कामाचा मोबदला त्यांना आता पालिकेमार्फतही देण्यात येईल. यानुसार त्यांना एका कामासाठी दुप्पट मोबदला मिळेल. यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेने नुकतेच या सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे –
मुंबईत सध्या ५९० आशा सेविका तर ३ हजार २०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. मुंबईत आरोग्य सेविका मोठ्या संख्येने असून विभागांमध्ये आरोग्याचे जास्त काम याच सेविका करतात. मुंबई महानगरपालिकेने नुकतेच या सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. याव्यतिरिक्त आशा सेविकांप्रमाणे कामानुसार मोबदला देण्याच्या धोरणाचा मुंबई महानगरपालिका अवलंब करणार आहे.
आरोग्य सेविकांनाही कामानुसार मोबदला –
आशा सेविकांप्रमाणेच आरोग्य सेविकांनाही कामानुसार मोबदला देण्यात येणार आहे. शहरानुसार कामाच्या स्वरुपात काही बदल केले जातील. त्यानुसार मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे घरोघरी सर्वेक्षण आणि निदान ही कामेही आरोग्य सेविकांना देण्यात येतील. याचा मोबदलाही स्वतंत्रपणे दिला जाईल. त्यामुळे आता आरोग्य सेविकांना मानधनापेक्षाही जास्त पैसे महिनाअखेर मिळतील, असे ही डॉ. कुमार यांनी सांगितले.