Ashish Pande : मी मुंबईत असताना मराठी आणि मुस्लीम माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही असं म्हणणारा टीसी आशिष पांडेला पश्चिम रेल्वेने निलंबित केलं आहे. पश्चिम रेल्वेमध्ये काम करणारे टीसी आशिष पांडे याची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे.

आशिष पांडे याने नेमकं काय म्हटलं होतं?

आशिष पांडे ( Ashish Pande ) याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये आशिष पांडे ( Ashish Pande ) समोरच्या मराठी व्यक्तीला सुनावताना दिसतो आहे. यामध्ये आशिष पांडे याने म्हटले होते की, मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लीम आणि मराठी लोकांना बिझनेसच देत नाही. मला कोणी मराठी किंवा मुस्लीम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही. मी फक्त युपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो, अशी मुजोरीची भाषा आशिष पांडे याने वापरली होती. यानंतर पश्चिम रेल्वेने आशिष पांडेचं निलंबन केलं आहे.

आशिष पांडेला मराठी व्यक्तीने केला होता फोन

आशिष पांडेला ज्या मराठी व्यक्तीने व्यवसायासंदर्भात फोन केला होता, त्यालाही पांडेने मी तुला बिझनेस देणार नाही, असं सांगितलं. त्याने म्हटले की, मी परवाच ट्रू कॉलरमध्ये तुमचा नंबर बघितला. तुम्ही मराठी आहात हे बघितल्यानंतर मी तुमचा नंबर डिलिट केला, हे तुम्हाला माहिती असेल. कारण मला मुस्लीम आणि महाराष्ट्रीयन माणसाला बिझनेस द्यायचा नाही. मी ९ वाजता कामाला जातो आणि १० वाजेपर्यंत ५ हजार रुपये कमावलेले असतात. मला पैशांचा गर्व नाही, पण मी तुम्हाला हे सांगतोय. मी मुंबईत असेपर्यंत मराठी आणि मुस्लीम लोकांना एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे सांगून आशिष पांडे याने फोन ठेवून दिला होता. मात्र, त्याची ही क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर आशिष पांडे हा कोण आहे, याचा शोध घेतला गेला. यानंतर रेल्वेकडून आशिष पांडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता त्याची चौकशी केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध प्रतिक्रिया उमटू लागताच तातडीने घेण्यात आली दखल

सोशल मीडियावर आशिष पांडे ( Ashish Pande ) आणि मराठी व्यावसायिकाची क्पिप चांगलीच व्हायरल झाली. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या. यानंतर DRM मुंबई सेंट्रल यांनी आशिष पांडेचं निलंबन केलं आहे. आम्ही या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे.