मुंबई : ‘गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न होत होते. परंतु विविध कारणास्तव ही मंजुरी सरकार दरबारी रखडली होती. आमची मराठी भाषा ही प्राचीनच असून तिचे वैभव मोठे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. नरेंद्र मोदींच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत मराठीजणांची स्वप्नपूर्ती केली. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्सोवा येथे मराठी चित्रपट कट्ट्याचे लोकार्पण आणि रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचे वर्षच मराठी माणसांसाठी आनंददायी आहे’, अशी भावना भाजप नेते आणि माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल सहा दशके अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते दिवंगत रमेश देव यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त अंधेरीतील (पश्चिम) वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ३० जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी अजिंक्य देव, अभिनय देव, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती मोठी आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सर्वगुणसंपन्न नायकाचे मूर्तिमंत उदाहरण हे रमेश देव होते. या महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे म्हणजे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बाब असून हा रस्ता प्रेरणादायी ठरेल’, असेही शेलार यांनी सांगत रमेश देव आणि सीमा देव यांच्या आठवणींना उजाळा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेते अजिंक्य देव म्हणाले की, ‘संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस असून बाबांच्या नावाचा मार्ग झाला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे, आमदार अमित साटम, माजी नगरसेवक रोहन राठोड यांनी प्रस्तावावर विचार केला आणि या मार्गाच्या नामकरणासाठी परवानगी दिली, या सर्वांचे मनःपूर्वक आभार’.