मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता प्रेक्षकांत बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींकडून ‘बंद करा बंद करा खालिद का शिवाजी बंद करा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत केलेली मागणी आणि भावना या आम्हाला पूर्णपणे मान्य असून समजल्या आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने याला प्रमाणित केले आहे. या गोष्टीचा फेरविचार करावा, अशी सूचना प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळ यांना सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
‘कुणाच्याही भावना दुखावणे किंवा चुकीचा इतिहास दाखवणे, तसेच जनक्षोभ होणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ‘सीबीएफसी’ने त्याचा फेरविचार करावा. हा चित्रपट मध्यंतरी चित्रपट महोत्सवासाठी पाठविण्याची भूमिका ज्या निवड समितीने घेतली, या संदर्भातील चौकशीचे आदेश मी दिले आहेत. त्यांनी योग्य अभ्यास केला होता का? चित्रपट पाहिला होता का? कथा वाचली होती का? खोडसाळपणा होता का? आदी सर्व गोष्टी तपासून निवड समितीने पाहिल्या होत्या का? संबंधित सर्व गोष्टींची चौकशी प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयालाने करावी. तसेच या विभागाने कायदेशीर सर्व प्रक्रिया पाहून आणि ‘सीबीएफसी’सोबत संपर्क साधून ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाबाबत फेरविचार करण्याची भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा करण्याचे आदेश दिले असल्याचेही ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
नेमके प्रकरण काय?
राज मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट ८ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के सैनिक मुसलमान होते आणि त्यांचे ११ अंगरक्षकही मुसलमान होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम सैनिकांसाठी रायगडावर मशीद बांधली होती, असे संवाद ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले आहेत. मात्र असे संवाद लिहून खोटा इतिहास पसरविण्यात येत असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले.
जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींकडून ‘बंद करा बंद करा खालिद का शिवाजी बंद करा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तींच्या हातात फलक होते आणि त्यांच्याकडून इतिहासाचे विकृतीकरण बंद करा अशीही घोषणाबाजी करीत मागणी करण्यात आली. या घोषणाबाजीनंतर तुम्ही तुमचे म्हणणे मांडले आहे, आता कार्यक्रम खराब करू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले.