मुंबई: महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता तेथे नवीन विकासाची हंडी लागेल आणि त्या विकासाच्या हंडीतील लोणी जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेतील लोणी कोणी खाल्ले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावताना दहीहंडी कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिहंडी उत्सवानिमित्त मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, नवी मुंबईतील गोविंदांना भेटी देत गोविंदाचा उत्साह वाढवला. फडणवीस यांनी प्रथम वरळी येथील जांबोरी मैदान येथे आयोजित केलेल्या परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले. महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली, तिथे नवीन विकासाची हंडी लागली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी, इतकी वर्षे लोणी कुठे जात होते, हे जनतेला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधने होती, सगळी बंधने एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना हटवण्यात आली. आता आमचे सरकार असून सगळी बंधने हटवण्यात आलेली असून राज्यभरात प्रचंड उत्साह सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याच उत्साहात दंहीहंडी साजरी होते आहे.
सैन्य दलाच्या शौर्याला सलाम
ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित दहीहंडी उत्सव प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सैन्य दलातील जवानांना भेटून संवाद साधला. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आ. राम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.