मुंबई – सहलीसाठी निघालेल्या १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मानखुर्द जंक्शन येथे हा अपघात घडला. फरार डंपरचालकाचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हसन इद्रीसी (१९) आणि त्याचा मित्र अशरफ शेख (२०) हे गोवंडीतील बैगनवाडी येथील रहिवासी आहेत. ते शनिवारी सकाळी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सहलीसाठी रायगड किल्ल्याकडे जात होते. सहलीसाठी त्यांनी अधिकृत नोंदणी केली नव्हती. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसह न जाता ते दुचाकीने जायला निघाले होते.
सकाळी त्यांनी गोवंडीमध्ये इंधन भरले आणि सहलीसाठी निघाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास मानखुर्दमधील टी-जंक्शनजवळ येताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने (एमएच ४३ सीके ७७२७) त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेमुळे मोटरसायकल चालवणारा अशरफ रस्त्यावर पडला आणि जखमी झाला. मागे बसलेला हसन डंपरच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या अपघातात हसनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, डंपर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. हसन हा चेंबूर येथील नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बी.एससी.डी.एस.च्या तृतीय वर्षात शिकत होता.
याप्रकऱणी मानखुर्द पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली अज्ञात डंपर चालकाविरुद्ध बेपर्वाईने आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे.