मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या व दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या अटल सेतूवरील चोरी आणि दरोडा टाकल्याच्या आरोपाप्रकरणी सहा आरोपींपैकी एका तरूणाला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो विशीतील तरूण असून घटनेच्या वेळी गाडी चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्ह्यातील गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोपीला जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईला जोडलेल्या या अटल सेतूचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर, ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अटल सेतूवर गाडी थांबवून आरोपी भाऊ आणि मित्रासह सेल्फी काढत होते. त्यांच्या गाडीपासून काही अंतरावर दोन गाड्यांमध्ये तक्रारदारासह त्याचे पाच मित्रही होते. आरोपींकडून होणाऱ्या गोंगाटावर त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे, त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. तक्रारदार व त्याचे मित्र तेथून निघून गेले. परंतु, आरोपींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना थांबवले आणि लोखंडी सळीने त्यांना मारहाण केली. तक्रारदाराच्या मित्राने या घटनेची चित्रफित काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींपैकी एकाने त्याचा फोन हिसकावून फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेले साडेतीन हजार रुपये आणि गाडीच्या चाव्याही बळजबरीने घेतल्या. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर या प्रकरणी चोरी, दरोडा आणि इतर संबंधित कलमांतर्गत शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – राज्यातील शाळांतील शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’, कोणत्या कपड्यांना बंदी?
दरम्यान, आरोपी हा विशीतील तरूण असून त्याची या प्रकरणी चौकशीही झालेली आहे. त्याच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. शिवाय, तो सांताक्रूझ येथे राहत असून पळून जाण्याची शक्यता नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर, त्याला जामीन मंजूर करण्याची मागणी त्याचे वकील शब्बीर शोरा यांनी केली होती.