मुंबईतील भाजपा नेत्या सुलताना खान यांच्यावर भर रसत्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास हा हल्ला झाला. सुलताना खान यांच्या अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, हल्लेखोर नेमके कोण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
सुलतानाच्या नवऱ्यालाही शिवीगाळ
सुलताना खान या भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. रविवारी रात्री त्या आपल्या नवऱ्यासोबत डॉक्टरांकडे जात होत्या. दोन दुचाकीस्वारांनी मीरा रोडजवळ त्यांची कार अडवली आणि सुलताना खान यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्यांच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही शिविगाळ करण्यात आली. हल्ल्यानंतर सुलताना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटणार? आशिष शेलार यांचं सूचक विधान
सुलताना यांनी पक्षाच्या नेत्यांची तक्रार केली होती
काही दिवसांपूर्वीच सुलताना यांनी पक्षाच्या काही नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. या हल्ल्यामागे भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचाही हात असण्याची शक्यता सुलतानाच्या नवऱ्याने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून घाबरलेलल्या सुलताना अद्याप कोणाशीही बोलण्याच्या मनस्थित नसल्याचे सांगण्यात आले आहे.