मुंबईः अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमित साटम यांच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रारी जुहू पोलिसांना प्राप्त झाली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने साटम यांच्या नावाचा वापर करून परिचित व्यक्तीला २५ हजार रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अंधेरीमधील लल्लूभाई श्यामलाल रोड परिसरात वास्तव्यास असलेले अमित भास्कर साटम (४८) अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. तक्रारीनुसार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता, आमदार साटम यांचे परिचित चैतन्य नाईक यांनी त्यांच्याशी संपर्क साधून एका अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशाबद्दल माहिती दिली. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव ‘सेहगल’ असल्याचे सांगितले आणि आमदार साटम यांचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला. त्याने इंडियन ओव्हरसीज बँकेतील ‘आयईसी युनिव्हर्सिटी, भोपाल’ या नावाने असलेल्या खात्याचे तपशील दिले आणि शैक्षणिक कारणासाठी २५ हजार ८६२ रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे नाईक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांंनी याबाबतची माहिती साटम यांना दिली.

तक्रारीनुसार ‘सेहगल’ नावाचा कोणताही कर्मचारी त्यांच्या कार्यालयात नाही आणि वापरलेला मोबाइल नंबरही त्यांच्याशी संबंधित नाही. या अज्ञात व्यक्तीने आपल्या नावाचा गैरवापर करून प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२) (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी मोबाइल क्रमांकाच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत. याशिवाय गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

गेल्या काही वर्षांत प्रतिष्ठीत, तसेच उच्चपदावर कार्यरत व्यक्तींच्या नावाने व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवून फसवणूक करण्याच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खासदार, आमदार, पोलीस अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी, सीमाशुल्क अधिकारी, सीबीआय अधिकारी यांच्या नावाने व्हॉट्स ॲपवरून संपर्क साधला जातो. त्यानंतर काही तरी कारण सांगून बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यास सांगितले जाते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी व्हॉट्स ॲप डीपीवर संबंधित प्रतिष्ठीत व्यक्तीच्या छायाचित्राचाही वापर करण्यात येतो. अशा प्रकारचे अनेक गुन्हे गेल्या काही वर्षात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.