मुंबई : साठोत्तरीच्या दशकातील मुंबईतील माणसांचे निम्नमध्यमवर्गीय आयुष्य, त्यातलं खुराडेपण, शारीर व्यवहारांमधली ऊर्जा आणि अपरिहार्यता यांना मराठी आणि इंग्रजीतही एकाच ताकदीने मोकळ्या-ढाकळ्या नैसर्गिक शैलीत मांडणारे कादंबरीकार किरण नगरकर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू ओढवला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी चाळ संस्कृतीला जागतिक पटलावर नेणाऱ्या ‘रावण अ‍ॅण्ड एडी’, ‘द एक्स्ट्रॉज’ आणि ‘रेस्ट इन पीस’ या त्यांच्या कादंबरी त्रयीमधून त्यांनी मुंबईचा गेल्या सहा दशकातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घुसळणीचा तिरकस भाषेत आढावा घेतला. त्यांच्या मराठीतील पहिल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीने मराठी साहित्यविश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली होती.  या कादंबरीची मोकळीढाकळी नैसर्गिक शैली, तिच्यात सतत जाणवणारा एक प्रकारचा तिरसटपणा , काळ आणि अवकाशाची वारंवार उलटापालट करून केलेल्या आशयसूत्रांच्या मांडणीतील नावीन्य किंवा कादंबरीचे पारंपरिक संकेतव्यूह नाकारणारा प्रयोगशील रचनाबंध यामुळे कादंबरीभोवती वादाचे मोहळ उमटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वादानंतर जाहिरात विश्वात काम करणाऱ्या नगरकरांनी मराठीत लिहिण्याचे टाळले. पुढे (‘रावण आणि एडी’ या त्यांच्या पहिल्याच इंग्रजी कादंबरीने त्यांच्याकडे जगभराचे लक्ष गेले.  गॉड्स लिटिल सोल्जर, रेस्ट अँड पीस आणि दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली जसोदा : अ नॉवेल या इंग्रजीतील निर्भीड आणि वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या वाचकांना भावल्या. बेडटाइम स्टोरी, कबीराचे काय करायचे, स्ट्रेंजर अमंग अस, द ब्रोकन सर्कल, द विडो ऑफ हर फ्रेण्डस्, द एलिफंट ऑन द माऊस, ब्लॅक टुलिप या त्यांच्या नाटकांनीही रसिकांच्या मनावर राज्य केले. समाजातील दांभिकतेवर त्यांनी त्यांच्या लेखनातून भाष्य केले.

‘ककल्ड’ कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट, ह ना आपटे पुरस्कार, दालमिया पुरस्कार आदींनी त्यांना गौरविण्यात आले होते.