साधारण महिनाभरापूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस दिवाळी सुरू झाली तरीही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हाती पडलेला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतआहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेली काही वर्षे सातत्याने तोटय़ात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला पालिकेने मदतीचा हात दिला असूून पालिकेने आतापर्यंत सुमारे १,८०० कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिले आहे. बेस्टने कर्जमुक्त व्हावे म्हणून हे अनुदान देण्यात आले आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज, तसेच टाटा पॉवरसह अन्य देणी यातून देण्यात आली आहेत. तसेच उपक्रमात केलेल्या काही आर्थिक सुधारणांमुळे बेस्टची स्थिती सुधारू लागली आहे. ही बाब लक्षात घेत बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ९,१०० रुपये बोनस देण्याची घोषणा साधारण महिन्यापूर्वी केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे  कर्मचाऱ्यांना बोनस मिळू शकला नाही.

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनसकडे लक्ष लागले आहे. धनोत्रयदशीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बँकेतील खात्यावर बोनस जमा होईल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र शनिवार लोटला तरीही बोनसची रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विलंबाने का होईना त्यांना बोनस दिला जाईल, अशी ग्वाही बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.