मुंबई : वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीपूर्वीच आयुष अभ्यासक्रमाची (बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस) तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर झाली. त्यामुळे आयुषच्या तिसऱ्या फेरीत चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळण्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार असल्याने या फेरीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (सीईटी कक्ष) करण्यात येत होती. त्यावर सीईटी कक्षाने संबंधित प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसारच राबविण्यात येत असून, परिषदेच्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच तिसऱ्या फेरीसंदर्भातील नियम हे नवीन नियम नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीमार्फत (एमसीसी) व आयुष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय आयुष प्रवेश समुपदेशन समितीमार्फत (एएसीसीसी) राबविण्यात येते. या दोन्ही केंद्रीय परिषदा या स्वतंत्र असून, प्रत्येक परिषद आपल्या नियमानुसार वेळापत्रक जाहीर करते. या वेळी एमबीबीएसचे वेळापत्रक वारंवार पुढे गेल्याने त्या अनुषंगाने राज्य कोट्याची तिसरी फेरी सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे परंतु आयुष अभ्यासक्रमाची केंद्राची तिसरी वेळेत जाहीर करण्यात आली. केंद्रीय परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार सीईटी कक्षाकडून प्रवेश फेरी राबवण्यात येते.
फेरीचे वेळापत्रक पाळणे हे सीईटी कक्षाला बंधनकारक असून प्रवेश झालेल्या उमेदवारांची यादी परिषदेच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी नियम हे राज्य शासनाच्या माहिती पुस्तिकेत दिलेले आहेत जे देखील केंद्रीय परिषदेच्या नियमांच्या अनुषंगाने तयार केलेले आहेत. तिसर्या फेरीत ज्या उमेदवाराला महाविद्यालय निवड झाले आहे, असे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र ठरणार नाही असा नियम माहिती पुस्तिकेत नमूद आहे. हा नियम हा नव्याने लागू केलेला नसून मागील बर्याच वर्षापासून आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या तिसर्या फेरीत ज्या उमेदवारांना महाविद्यालय निवड झाली आहे असे उमेदवार हे राज्याच्या तिसर्या फेरीत अपात्र ठरतात हे देखील माहिती पुस्तिकेत नमूद असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आयुष अभ्यासक्रमाची केंद्रीय कोट्याची तिसरी फेरी पूर्ण झाली असून चौथी फेरी ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणे नियोजित आहे. त्यापूर्वी राज्याची तिसरी फेरी पूर्ण होणे आवश्यक असल्याने सीईटी कक्षाकडून आयुषची तिसरी फेरी जाहीर केल्याचेही सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
