महाराष्ट्रातील सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यावरून निर्माण झालेल्या विरोधाची धार आज अधिकच तीव्र झाली असली, तरी बुधवारी ‘राज भवन’वरील सोहळ्यात हा पुरस्कार पुरंदरे यांना देण्याचा सरकारचा निर्णय ठाम असून, ‘दरबार हॉल’मध्ये या सोहळ्याची तयारीदेखील सुरू झाली आहे. दरम्यान, विरोधकांना उत्तर देण्यासाठी काही जण सज्ज झाले असून, पुरंदरे यांच्या योग्यतेचे दाखले घेऊन त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण मैदानातही उतरल्याने, राजकीय मैदानात सुरू झालेल्या या लढय़ाला आता वैचारिक स्वरूप प्राप्त होणार असे दिसू लागले आहे. पुरंदरे यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधात ‘खलित्यां’ची लढाई सुरू झाली आहे.
हा पुरस्कार बाबासाहेबांना याआधीच द्यायला हवा होता, असा दावा करणारे एक निवेदन आता पुरंदरे विरोधकांशी सामना करण्याकरिता सज्ज झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कारकिर्दीचा आणि कर्तृत्वाचा संपूर्ण आलेखच या निवेदनाद्वारे मांडण्यात आला असून बाबासाहेबांना इतिहास संशोधक म्हणून मान्यता देणाऱ्या मान्यवरांची यादीच त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. राजामाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न. र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, भारतरत्न लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे. डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने तर त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन १४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते, याकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक दस्तावेजांचा  सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाटय़, या साऱ्या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढय़ांपर्यंत पोहोचविले. दादरा नगरहवेली मुक्ती लढय़ाचे ते स्वातंत्र्यसैनिक आहेत, आणि पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात संशोधक म्हणूनही ते सहभागी झाले आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘वाढलेल्या वयाचा विचार करून हा पुरस्कार देणे गैर आहे’ असे म्हणणाऱ्यांनी, वयाच्या चौदाव्या वर्षांपासून इतिहासाशी आणि विशेषत शिवचरित्राशी एकरूप होऊन त्यामध्ये झोकून देणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या तपश्चर्येची आदरपूर्वक नोंद घेतली पाहिजे व पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजे, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे. या निवेदनावर माजी खासदार प्रदीप रावत, अविनाश धर्माधिकारी, इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. ना. धनागरे, मृणालिनी शिवाजीराव सावंत, भारत इतिहास संशोधन मंडळाचे श्री. मा. भावे, इतिहास व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babasaheb purandare maharashtra bhushan award row
First published on: 18-08-2015 at 03:16 IST