मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील धारावी मेट्रो स्थानक परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास नागाचे एक पिल्लू आढळले. स्थानिक पोलिसांनी सर्पमित्रांना बोलावून नागाच्या पिल्लास पकडून त्याला जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेनंतर प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेट्रो ३ मार्गिकेचे काम आरे जंगल, खाडी परिसर अशा ठिकाणी सुरु असून अनेकदा साप, नाग, अजगर, धामण, घोणस हे साप आढळतात. सर्पमित्रांनी जीवदान देत त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. बीकेसी परिसरात सर्वाधिक साप, नाग आढळल्याच्या घटना आहेत. मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम आणि संचलन ज्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी)माध्यमातून केले जात आहे, त्या एमएमआरसीच्या कार्यालयाच्या आवारातही घोणस, धामणीचे पिल्लू आढळले होते.

आता मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते आचार्य अत्रे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच मेट्रो स्थानकात नागाचे पिल्लू आढळले आहे. रविवारी सायंकाळी धारावी मेट्रो स्थानकांच्या उद्वाहकाच्या शेजारी नागाचे पिल्लू आढळले. हे पिल्लू आढळल्यानंतर स्थानिक पोलिसांनी महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनचे सर्पमित्र कौशिक केणी यांना बोलावले. त्यानंतर कौशिक केणी यांनी या पिल्लास जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले.

धारावी स्थानकाच्या परिसरात आढळलेले नागाचे पिल्लू असून नाग हा विषारी असतो. नागामध्ये मुख्यत्वे न्यूरोटाॅक्सिन प्रकारचे विष असते. हे विष मानवी मेंदूच्या कार्यावर परिणाम करते. ज्यामुळे लकवा वा श्वसनाचा त्रास होतो असे कौशिक केणी यांनी सांगितले. प्रवाशांनी प्रवास करताना सतर्क रहावे असे आवाहनही केणी यांनी केले.