मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू व त्यांचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आता बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच, आता सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.
नेमका वाद काय?
बच्चू कडूंनी काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने केलेल्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरनं एकतर या जाहिराती सोडाव्यात किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्यानं परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. याच मागणीसाठी आज प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जमले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत बच्चू कडू व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
आता गणपती मंडळांबाहेर सचिन तेंडुलकर दानपेटी!
दरम्यान, बच्चू कडूंनी आपल्या मागणीसाठी सर्व गणेश मंडळांच्या मंडपांबाहेर ‘सचिन तेंडुलकर दानपेटी’ ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “सचिन तेंडुलकर यांचे खूप चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यामुळे त्याचे परिणाम जनमानसावर पडत आहेत. कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. त्यांनी जर ही जाहिरात सोडली नाही, तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. आम्ही गणपतीलाही प्रार्थना करणार आहोत की सचिन तेंडुलकर यांना चांगली बुद्धी द्यावी”, असं बच्चू कडू म्हणाले.
“सचिन तेंडुलकरनं भारतरत्न परत करावा, ३०० कोटी घेऊन…”, ‘त्या’ प्रकारावरून बच्चू कडू आक्रमक!
“त्यांनी जाहिरात सोडावी किंवा भारतरत्न तरी परत करावं. त्यांना भारतरत्न नसतं, तर आम्ही काही बोललो नसतो. पण ते देशाचे भारतरत्न आहेत”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
“गणेश विसर्जनाच्या दिवशी सगळा पैसा…”
दानपेटीत जमा होणारा सर्व पैसा गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिन तेंडुलकरला आणून देणार असल्याचंही बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केलं. “१५ दिवसांत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक गणेश मंडळासमोर सचिन तेंडुलकर दानपेटी राहील. त्यातून जेवढा पैसा येईल, तेवढा गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्ही सचिन तेंडुलकर यांना आणून देऊ”, असं बच्चू कडू यांनी नमूद केलं.
“भारतरत्न जुगाररत्न होऊ नये”
“या जाहिराती करणारे इतर सेलिब्रिटी हे भारतरत्न नाहीयेत. भारतरत्न भगतसिंगांना मिळाला नाही, आण्णाभाऊ साठेंना मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. फक्त सचिन तेंडुलकर हा आमचा विषय नाही. भारतरत्न हा आमचा विषय आहे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये. आम्ही वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे”, असंही ते म्हणाले.