गेल्या वर्षी अहमदनगर येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडय़ांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली होती. त्याच अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर निवडून आला तर उपमहापौरपदाची खुर्ची  काँग्रेसला मिळाली.
गेल्या वर्षी राज्यभराच्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शरद पवार यांनाही त्यांनी बोचरे प्रश्न विचारले होते. यावरून अहमदनगर येथील सभेनंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडय़ांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली तर पुण्यात राज यांना यायला बंदी घालण्याची घोषणाही राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केली होती. ‘काकाने हात काढला तर अजित पवार यांना पानपट्टीवालाही विचारणार नाही,’ या राज यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली होती. या पाश्र्वभूमीवर अहमदनगर येथील महापालिका निवडणुकीत मनसेने बराच जोर लावला होता. मनसेचे चार नगरसेवक निवडून आले तर आठ अपक्ष विजयी झाले. खरेतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला मनसेच्या पाठिंब्याची गरजही नव्हती, तरीही मनसेने महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. राज यांच्या ताफ्यावरील दगडफेकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेला या निवडणुकीत तटस्थ राहणे शक्य असतानाही राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे ‘आप’मतलबी ‘राज’कारण मनसेने केल्याची टीका शिवसेनेकडून होत आहे. अजित पवार यांना ‘खांदा’ देण्याची भाषा दोन वर्षांपूर्वी राज यांनी केली होती.  त्यांच्याच मनसेने अहमदनगर येथे राष्ट्रवादीला ‘खांद्यावर’ उचलून घेतले आहे तर ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर तीन पायांची शर्यत सुरू आहे. माझा पक्ष इतरांपेक्षा वेगळा असेल, अशी घोषणा करणाऱ्या राज यांच्या मनसेचेही पाय मातीचेच असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.
अहमदनगर पालिका बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस १८,काँग्रेस ११
शिवसेना १७,भाजप ९
मनसे ४, अपक्ष ९
एकूण जागा ६८