शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही तातडीने दखल घेतली. महाराष्ट्रात राजकीय चळवळ उभारणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या कार्याने प्रभावित झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आपल्या संकेतस्थळांवर बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले.
भारतातील सर्वात वादग्रस्त राजकारणी – बीबीसी
धर्म, परराज्यांतून आलेले लोंढे आणि जातीयवाद या मुद्दय़ांवर धगधगते भाष्य करून एक आक्रमक शिवसेनेची उभारणी करणारा भारतातील सर्वाधिक वादग्रस्त राजकारणी, असा बीबीसीने बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातून दक्षिण भारतीयांना हाकलून लावण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार रोखण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांनी मुस्लिमांना प्रामुख्याने लक्ष्य केले. १९९३ मधील मुंबईत झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीत सुमारे ६०० मुस्लिमांचा बळी गेला होता. या दंगलीसाठी शिवसेनेला आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना दोषी ठरवण्यात आले. मात्र शिवसेनाप्रमुखांवर कसलाही गुन्हा दाखल झाला नाही. २००२ आणि २००८ त्यांनी मुस्लिमांवर हल्ले करण्यासाठी हिंदूंना आत्मघातकी पथके तयार करण्याचे आवाहन केले. शिवसेनाप्रमुखांनी आपण मुस्लीमविरोधी नसल्याचे म्हटले असले तरी पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांचा त्यांनी नेहमीच कडाडून विरोध केल्याचे बीबीसीने म्हटले आहे. नेहमी गॉगल वापरणारे, गळ्यात रुद्राक्ष माळ घालणारे आणि अंगाभोवती भगवे वस्त्र लपेटणाऱ्या शिवसेनाप्रमुखांची मुंबई शहरावर कमालीची पकड होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या एका हाकेवर त्यांचे समर्थक अनेकदा हिंसक होऊन मुंबई ठप्प करायचे.
हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याचे निधन- सीएनएन
भारतात हिंदू राष्ट्रवादाचा कट्टर पुरस्कार करणारे आणि देशाच्या आíथक राजधानीवर वर्चस्व ठेवणाऱ्या राजकीय पक्षाचे वादग्रस्त नेते बाळ ठाकरे यांचे निधन झाल्याचे सीएनएनने म्हटले आहे. मराठी माणसांच्या हितासाठी सुरू केलेल्या चळवळीतून १९६० मध्ये नेतृत्व म्हणून उभरणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईवर आणि महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित केले. परप्रांतामधून मुंबईत येणाऱ्या लोंढय़ाविरोधात त्यांनी उग्र चळवळ उभारली. मराठीचा आग्रह धरणाऱ्या बाळासाहेबांनी बॉम्बेचे मुंबई असे मराठी नामकरण केले. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली विस्तारलेली शिवसेना संपूर्ण देशात हिंदू राष्ट्रवादाची चळवळ म्हणून पसरली. अनेक भारतीयांसाठी ते गॉडफादर म्हणून होते. आक्रमक नेतृत्वगुण आणि भूमिकेमुळे समर्थकांसाठी ते वंदनीय होते तर इतरांमध्ये त्यांची दहशत होती.
हिटलरचा प्रशंसक असणारा नेता- न्यूयॉर्क टाइम्स
कट्टरपंथी हिंदू राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेचे संस्थापक असणारे आणि भारतीय राजकारणात प्रभावी ठसा उमटवणारे बाळासाहेब ठाकरे हे जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचे प्रशंसक म्हणून स्वत:ची ओळख सांगणारा नेता होते, असे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. महाराष्ट्राचा वाघ असाही त्यांचा उल्लेख केला जात असल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. परप्रांतीय आणि मुसलमान यांच्यामुळे मुंबईतील स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा मुद्दा उचलून त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लढाई उभारली.
बाहेरून येणाऱ्या लोंढय़ांमुळे तसेच मुस्लिमांमुळे मुंबईतील मराठी माणसाच्या नोकऱ्या, संपत्ती आदींना धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट करीत मराठी माणूस आणि मध्यमवर्गीय हिंदू समाजाला त्यांनी आपलेसे केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2012 रोजी प्रकाशित
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांवरही बाळासाहेबांची भुरळ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही तातडीने दखल घेतली. महाराष्ट्रात राजकीय चळवळ उभारणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या कार्याने प्रभावित झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आपल्या संकेतस्थळांवर बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले.
First published on: 19-11-2012 at 02:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death cover on top by international media