|| प्रसाद रावकर

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल बुजूर्ग शिवसैनिकांची नाराजी:- आदित्य ठाकरे यांच्या रूपात ठाकरे घराण्यातील पहिला सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे पक्षात जल्लोषाचे वातावरण असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कार्यरत राहिलेल्या बुजूर्ग शिवसैनिकांनी मात्र याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. घराणेशाहीचा प्रचंड तिटकारा असलेल्या शिवसेनाप्रमुखांची तत्त्वे आणि विचारसारणीचाच पक्षाला आता विसर पडू लागल्याची खंत यातल्या काहींनी व्यक्त केली. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा नातू म्हणून नव्हे तर, पक्ष पुढे नेण्यासाठी निवडणूक लढवावी, असा सल्लाही या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून शिवसेनेतच आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकेकाळी बाळासाहेबांच्या निष्ठावंतांच्या फळीतील, शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी आदित्य यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर काही ज्येष्ठ नागरिकांनी कौतुकही केले आहे.

‘वारसाहक्काबाबत शिवसेनाप्रमुखांना तिटकारा होता. पण आता शिवसेनाप्रमुखांची तत्त्वे, ध्येय, धोरणांचा शिवसेनेला विसर पडू लागला आहे. शिवसेनेतही घराणेशाही डोके वर काढू लागली आहे. शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा वचक कमी होऊ लागला आहे,’ असे मत शिवसेनाप्रमुखांचे खंदे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे ज्ञानेश्वर गावडे यांनी व्यक्त केले.

‘शिवसेनाप्रमुखांचा नातू हुशार आणि सुशिक्षित आहे. त्याने एवढय़ा लवकर निवडणुकीच्या रिंगणात उतरायची गरज नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणले.

पण तत्पूर्वी १० वर्षे त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करायला लावले. त्यानंतरच त्यांना राजकारणात प्रवेश दिला,’ असे मत व्यक्त करीत ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. प्रशांत साखरदांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या निर्णयाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली. शिवसेना-भाजप युतीवरून चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. अखेर १२४ जागा पदरात पाडून काय मिळाले. शिवसेनेत आता बडय़ांचे प्रस्थ माजले आहे. निष्ठावंतांना काडीचे महत्त्व उरलेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

वेलणकरांचे कौतुकोद्गार

शिवसेनाप्रमुखांची दृष्टी वेगळी होती. त्यांनी कधीही निवडणूक लढविली नाही. पण त्यांचे पक्षावर नियंत्रण होते. शिवसेना पुढे नेण्याची जबाबदारी आता आदित्यवर आहे. बाहेर बसून पक्षावर नियंत्रण ठेवण्याऐवजी आपली मते, विचार मांडण्यासाठी निवडणूक लढविण्याचा आदित्यचा निर्णय योग्य म्हणावा लागेल, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ शिवसैनिक सुनील वेलणकर यांनी काढले.

संपत्ती कुठून आली?

शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांनी अशीच संधी राज ठाकरे यांना दिली होती. पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही. तशीच संधी आता आदित्य ठाकरेंनाही चालून आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा त्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. पण शिवसेनाप्रमुखांचा नातू म्हणून नव्हे, तर बदलत्या परिस्थितीत शिवसेनेला पुढे नेण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवायला हवी, असे मत लढवय्या शिवसैनिक अशी ओळख असलेले अनिल परुळेकर यांनी व्यक्त केले. आदित्यच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखविलेली १६ कोटी रुपयांची मालमत्ता आली कुठून, असा सवाल मात्र त्यांना नक्की विचारणार, असेही ते म्हणाले. बाळासाहेबांचा काळ वेगळा होता. आता काळ बदलला आहे. त्यामुळे नव्या पिढीनुसार वागावे लागते, अशी सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत देवळेकर यांनी व्यक्त केली.