मुंबई : खासगी कंपन्या, कॉर्पोरेट जगत, असंघटीत क्षेत्रातील कामगार अशा वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करावे. तसेच, राष्ट्रीय छात्र सेना, महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागांतर्गत कार्यरत आपदा मित्र यांचीही मदत घ्यावी. नागरिकांची गर्दी होणाऱ्या बाणगंगा महोत्सवासारखे कार्यक्रम, महोत्सव मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्यांचा यथायोग्य विचार करावा, अशा सूचना अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी सोमवारी दिल्या. तसेच, दीपावली सणानंतर स्वीप उपक्रमाच्या अंमजबजावणीचा वेग वाढवावा, असेही त्यांनी नमूद केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी स्वीप उपक्रमांतर्गत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी सुरु असलेल्या विविध जनजागृती उपक्रमांचा तसेच पुढील नियोजनाचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचून मतदान करण्याबाबत जनजागृती होईल, या दृष्टीने उपक्रमांची संख्या वाढवावी, असेही जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई : ‘मेट्रो२ ब’च्या कामात कंत्राटदाराकडून पुन्हा दिरंगाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच यापुढे नियोजित उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी सादर करण्यात आली. विविध शासकीय कार्यालयांमध्ये फलक, भित्तीपत्रके, स्टॅण्डीज लावणे, बेस्ट बस आणि बस थांब्यांवर प्रसिद्धी करणे, मोठ्या मंडई तसेच व्यापारी संकुल तसेच पर्यटकांचा अधिक वावर असलेल्या ठिकाणी पथनाट्य सादर करणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृतीसाठी करण्यात येत आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.