मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंगात भूत संचारल्याने त्यांनी महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. बोम्मई हे वरिष्ठांना विचारुन भाजपची भूमिका बोलत आहेत का, असा सवाल करीत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर खेळत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. सीमाप्रश्नी केंद्र सरकार, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतीना ठाकरे म्हणाले, राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. मुख्यमंत्री गंभीर नाहीत. उद्योग गुजरातला जात आहेत. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे ?
नाना पटोले यांचे टीकास्त्र
सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजप सरकारचा हा आगाऊपणा खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
एकही गाव कर्नाटकात जाणार नाही : फडणवीस
बोम्मई किंवा अन्य कोणीही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नसून आम्ही न्यायालयात लढू आणि महाराष्ट्राची गावे परत मिळवू, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह अन्य गावांवरही महाराष्ट्राचा दावा असून आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयापुढील दाव्यात मांडलेली आहे. पुरावेही सादर केले आहेत, असे सांगून फडणवीस म्हणाले, कोणी कितीही दावे केले, तरी आमचे एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, उलट आमची गावे परत मिळतील. न्यायालयात व संविधानाच्या चौकटीत जी मागणी केली आहे, त्याला कोणी चिथावणीखोर म्हणू शकत नाही.