मुंबई : बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीचा निकाल बुधवारी रात्री उशीरा जाहीर झाल्यानंतर ८ ऑगस्टपासून या अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) सुरुवात करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या जवळपास एक लाख असलेल्या जागांसाठी एकूण ९४ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
राज्यात बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या सीईटीसाठी ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील फक्त ६१ हजार ६६६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सीईटी कक्षाकडून १९ व २० जुलै रोजी अतिरिक्त सीईटी घेण्यात आली. या सीईटीसाठी ४० हजार ६६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३२ हजार ८३९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित हाेते.
अतिरिक्त सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेत विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमाकडे वळू नयेत यासाठी सीईटी कक्षाने अतिरिक्त सीईटी झाल्यानंतर अवघ्या १७ दिवसांमध्ये निकाल जाहीर केला. त्यानंतर दोन दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी ८ ते १३ ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.