मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ घरांचा ताबा पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला जाणार आहे. त्यामुळे ताबा मिळणाऱ्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्याचवेळी या दोन्ही इमारतींच्या खिडक्यांना संरक्षक जाळ्या नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. नुकतीच वसईत एक लहान मुलगी बाराव्या मजल्यावरुन पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुनर्वसित इमारतींच्या खिडक्यांना संरक्षक जाळ्या (ग्रील) बसविण्याची मागण्याची रहिवाशांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे केली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन रहिवाशांनी दिले आहे.

वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. वरळीत पहिल्या टप्प्यात १३ पुनर्वसित इमारती बांधण्यात येत आहेत. या १३ इमारतींमध्ये ३००० हून अधिक घरांचा समावेश आहे. १३ पुनर्वसित इमारतींपैकी दोन इमारतींचे काम पूर्ण झाले असून या इमारतींना निवासी दाखला ही देण्यात आला आहे. या घरांसाठी पात्र रहिवाशांची सोडत काढत कोणत्या मजल्यावरील कोणत्या क्रमांकाचे घर कोणत्या रहिवाशांसाठी असेल हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चाळ क्रमांक ३०,३१ आणि ३६ मधील रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात १८० चौ. फुटाच्या घरातून थेट ४० मजली इमारतीतील ५०० चौ. फुटाच्या घरात वास्तव्यास जाण्याचे ५५६ बीडीडीवासियांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. मात्र त्याचवेळी रहिवाशांमध्ये काहीशी भीती आहे. कारण पुनर्वसित इमारतींच्या खिडक्यांना संरक्षक जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. ४० मजली इमारती असताना इमारतींच्या खिडक्यांना कुठेही जाळ्या नसल्याने रहिवाशांनी खिडक्यांना जाळ्या बसविण्याची मागणी केली आहे.

वसईत काही दिवसांपूर्वी आईने आपल्या लहानगीला चप्पलच्या कपाटावर बसविले आणि काही सेकेंदातच ती लहानगी खिडकीतून बाहेर पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसित इमारतींच्या खिडक्यांना जाळ्या नसल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे खिडक्यांना जाळ्या बसविण्याची मागणी मुंबई मंडळाकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन मुंबई मंडळासह एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती वरळीतील रहिवाशी सुरेश खोपकर यांनी दिली. याविषयी मुंबई मंडळाच्या अधिकार्यांना विचारले असता खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविण्याची परवानगी अग्निशमन दलाकडून मिळत नाही. त्यामुळे अशा जाळ्या बसवता येत नसल्याचे रहिवाशांना कळविले. तर त्यांच्या मागणीनुसार वायरच्या जाळ्या बसविण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी मिळाली नाही असे अधिकार्यांनी सांगितले. पण रहिवाशी मात्र जाळ्या बसविणार्यावर ठाम आहेत. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची ही मागणी आहे. तेव्हा आता म्हाडा आणि एकनाथ शिंदे यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.