उद्यापासून मुंबईसह दिल्ली, चेन्नईत वापरास सुरुवात
तब्बल ४० वर्षांनंतर क्षयरोगावरील आलेल्या बेडाक्युलीनचा या नवीन औषधाचा उपयोग एक्सडीआर क्षयरोग रुग्णांसाठी केला जाणार आहे. या औषधांच्या वापराबाबत अनेक अटी असून जागतिक आरोग्य संघटनेने औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगावरील उपचारांसाठी हे औषध सुचविले आहे. भारतात पहिल्यांदाच या औषधाचा वापर होत असून महानगरपालिकेकडून जागतिक क्षयरोग दिनाच्या पाश्र्वभूमीवर हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर बेडाक्युलिन या औषधाला क्षयरोगाबाबत मिरॅकल ड्रग म्हणून संबोधले गेले आहे. इतर औषधांना दाद न देणारा क्षयरोग या औषधामुळे तुलनेने कमी वेळेत आटोक्यात आला आहे. मात्र या औषधाच्या उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांची संख्या इतर क्षयरोगाच्या उपचारांदरम्यानच्या संख्येपेक्षा अधिक असल्याची टीकाही झाली आहे. त्यामुळेच हे औषध अत्यंत योग्यरीत्या वापरणे गरजेचे आहे. मुंबईत २०१५ मध्ये क्षयरोगाचे २७ हजार १८३ रुग्ण आढळले. डॉट्स कार्यक्रमातील क्षयरोगाच्या दोन्ही औषधांना दाद देत नसलेल्या क्षयरोगावरील उपचारांसाठी बेडाक्युलीन वापरले जाईल. देशभरातील ६०० रुग्णांवर या औषधाने उपचार केले जातील.
क्षयरोगाचे लवकर निदान होण्यासाठी या महिन्यात मुंबईत आणखी आठ सीबीनॅट केंद्रांची सुरुवात झाली असून या केंद्रांची संख्या आता १६ झाली आहे. याशिवाय क्षयरोगाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या शहरातील १२ भागांमध्ये घरोघरी जाऊन पाहणी करण्याची योजनाही या वर्षी अमलात येईल.
* २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारकडून बेडाक्युलिन हे औषध २१ मार्चपासून अधिकृतरीत्या उपलब्ध.
* दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबादमध्ये वापर.