scorecardresearch

बेस्टच्या कंत्राटी चालकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन; वेतन, भविष्य निर्वाह निधीच्या मुद्दय़ांवरून संघर्ष

वेतन वेळेवर न मिळाल्याने आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कमही खात्यात जमा न केल्याने बेस्ट उपक्रमाच्या पाच आगारातील कंत्राटी चालकांनी बुधवारीही काम बंद आंदोलन पुकारले.

मुंबई: वेतन वेळेवर न मिळाल्याने आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कमही खात्यात जमा न केल्याने बेस्ट उपक्रमाच्या पाच आगारातील कंत्राटी चालकांनी बुधवारीही काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले.  आंदोलनामुळे पाच आगारातून ३०८ गाडय़ा रद्द करण्यात आल्या.

मंगळवारीही कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, वडाळा, कुलाबा या आगारातील एमपी ग्रुपच्या कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केले होते. त्याआधी साधारण एक ते दोन महिन्यात तीन वेळा आंदोलन करून बेस्टची सेवा बंद पाडली होती. त्यानंतर वेतन देणे आणि भविष्य निर्वाह निधी जमा करण्याचे आश्वासन संबंधित कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. वेतन तर दूरच भविष्य निर्वाह निधीही जमा न केल्याने मंगळवारी कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे पाच आगारातील १६३ गाडय़ा धावू शकल्या नाहीत. बुधवारीही कंत्राटी चालकांनी सकाळपासून आंदोलन केल्याने पाच आगारातून बेस्ट बस सुटू शकल्या नाहीत. परिणामी ३०८ बस प्रवाशांच्या सेवेत आल्या नाहीत. याचा फटका प्रवाशांना बसला. घर ते रेल्वे स्थानक, तसेच रेल्वे स्थानक ते कार्यालय गाठण्यासाठी किंवा अन्यत्र जाण्यासाठी बस वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे बस थांब्यावर प्रवासी बराच वेळ ताटकळत उभे होते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने स्व:मालकीच्या ११३ बस चालवल्या. मात्र ही संख्या कमीच असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. विक्रोळी. वांद्रे, कुर्ला आगारातून सुटणाऱ्या सर्वाधिक बस रद्द झाल्या.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्व:मालकीबरोबरच भाडेतत्त्वावर बस आहेत. भाडेतत्त्वावरील बस ज्या कंपनीकडून घेतल्या आहेत, त्यांच्याकडूनच कंत्राटी चालकांची नियुक्ती केली आहे. असे बेस्टमध्ये सहा कंत्राटदार आहेत. उपक्रमाकडून प्रत्येक न चालवलेल्या बसमागे पाच हजार रुपये दंड कंत्राटदारावर आकारण्यात येतो.

एका आगारात आश्वासन..

वेतन आणि भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, वडाळा, कुलाबा या आगारातील कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. यातील कुलाबा आगारातील कंत्राटी चालकांकडून वेतन आणि भविष्य निर्वाह निधीच्या मुद्दयावरून १९ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार होते. त्यांचे वेतन अदा केल्याने आणि अन्य देणी देण्यासाठी कंत्राटदाराने २५ मे पर्यंत मुदत मागितल्याने आंदोलन मागे घेतले. मात्र उर्वरित चार आगारातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन रात्री उशिरापर्यंतही सुरूच होते. गुरुवारीही चार आगारातील कंत्राटी चालकांचे आंदोलन सुरूच राहण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best contract drivers protest another day struggle over salary provident fund issues ysh

ताज्या बातम्या