* अर्थसंकल्पातील अंदाजानुसार २४२ कोटी रुपये कमी मिळणार
* टीडीएलआर रद्द होण्याच्या शक्यतेमुळे नुकसान
परिवहन विभागातील तूट नियमाने भरून काढणाऱ्या आणि बेस्ट प्रशासनाचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या विद्युत विभागाचे उत्पन्न २०१६-१७ या वर्षांत कमालीचे खालावणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. परिवहन विभागातील तूट वीजबिलांतून भरून काढणारा टीडीएलआर एप्रिल २०१६पासून रद्द होणार असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, अर्थसंकल्पात वीज युनिटच्या विक्रीत घट झाल्याचेही दिसत असल्याने ही गोष्ट गंभीरपणे घेण्याची गरज समिती सदस्य व्यक्त करत आहेत.
बेस्टचा विद्युत विभाग आतापर्यंत नेहमीच नफ्यात राहिल्याने बेस्टची आर्थिक घडी कशीबशी सावरण्यात प्रशासनाला यश आले आहे. २०१४-१५ या वर्षांत या विभागाचे उत्पन्न ४६२५.२२ कोटी एवढे होते. या वर्षी विद्युत विभागाला ९२५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. विद्युत विभागाचे उत्पन्न २०१५-१६ या वर्षांत वाढून ५११२.३० कोटींवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार विद्युत विभागाला १२१७.०६ कोटी रुपये नफा मिळणार आहे. मात्र २०१६-१७ या वर्षांत हे उत्पन्न २४२ कोटी रुपयांनी कमी होऊन ४८६९.८४ एवढे होणार आहे. तर विद्युत विभागाचा नफा केवळ ९३५ कोटी एवढाच होण्याची शक्यता अर्थसंकल्पात वर्तवण्यात आली आहे.
समिती सदस्यांनी या कमी उत्पन्नाची कारणे विचारली असता, एप्रिल २०१६पासून रद्द होणाऱ्या टीडीएलआरमुळे विद्युत विभागाचे उत्पन्न कमी होणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. मुळात या कमी होणाऱ्या उत्पन्नाची रक्कम ५२२ कोटी रुपये एवढी होती. मात्र ‘महापालिका अनुदान प्रकरणा’मुळे ३५५ कोटी रुपयांचा हिशोब देण्यासाठी हे उत्पन्न २८० कोटी रुपयांनी वाढवून उत्पन्नातील घट केवळ २४२ कोटी रुपये एवढीच दाखवण्यात आली आहे.
आतापर्यंतच्या इतिहासात अर्थसंकल्पात दाखवलेल्या उत्पन्नाचा आकडा गाठणे बेस्ट प्रशासनाला शक्य झालेले नाही. त्यामुळे उत्पन्नातील ही तूट केवळ २४२ कोटींवर राहणार नसून ती जास्त असेल. एकीकडे मुंबई वाढत असताना बेस्टचे वीजग्राहक कमी होत आहेत. यात टाटाशी स्पर्धा होण्याचा मुद्दा आहे का, तो असल्यास बेस्टने या स्पर्धेत उतरण्यासाठी काय तयारी केली आहे, असे अनेक मुद्दे समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी उपस्थित केले. मात्र प्रशासनातर्फे त्याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
बेस्टच्या विद्युत विभागाचे उत्पन्न खालावणार
अर्थसंकल्पातील अंदाजानुसार २४२ कोटी रुपये कमी मिळणार
Written by मंदार गुरव

First published on: 24-11-2015 at 02:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best electrical departments income will decrease