मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांना रोखीने पगार देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्याच्या पगारापैकी २० हजार रुपये सुट्ट्या नोटा व नाण्यांच्या स्वरुपात देण्यात आले आहेत. त्यात एक हजार रुपयांची नाणी देण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या या पद्धतीमुळे बेस्टचे कामगार, कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्ट उपक्रमाच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कामगारांना वेतन म्हणून २० हजार रुपये रोखीने दिले जाणार आहेत. गेल्या काही वर्षापासून बेस्ट उपक्रमात पगार याच पद्धतीने दिला जात असून रोख रकमेचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी त्रास्त झाले आहेत.
सुट्टी नाणी आणि नोटाचे करायचे काय?
बेस्टकडे तिकिटाच्या रकमेतून येणारी पाच, दहा रुपयांची नाणी व वीजेच्या बिलांच्या रकमेतून येणाऱ्या सुट्ट्या नोटांचा खच बेस्टकडे पडतो. सुट्ट्या पैशांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारातून ही रोख रक्कम देण्याची पद्धत बेस्टने पाच सहा वर्षापूर्वी सुरू केली.
अर्धा अर्धा पगार…
त्यात १९ हजार रुपये एवढी रक्कम छोट्या मूल्यांच्या नोटांच्या स्वरुपात व एक हजार रुपये नाण्यांच्या स्वरुपात दिले जाणार आहेत. तर उरलेला पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन २० हजारापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांनाच अर्धा पगार रोखीच्या स्वरुपात दिला जाणार आहे.
पगार घ्यावा मोजून…
प्रत्येक विभागाच्या आस्थापना अधिकाऱ्याने सर्व रक्कम आगारातील तिकीट व रोख विभागातून घेताना जागेवरच मोजून घ्यावी व त्यामध्ये काही तफावत आढळली तर ताबडतोब तिकीट व रोख विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यानंतर त्यांना सूपूर्द केलेल्या रकमेत काही तफावत आढळल्यास त्याबद्दल कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असे बेस्ट प्रशासनाने परिपत्रकातून बजावले आहे.
कामगार सेनेचे आरोप
कामगार सेनेने बेस्ट उपक्रमाच्या या ढिसाळ नियोजनावर टीका केली आहे. गेल्या काही वर्षांत बेस्टचा कारभार नियोजन शून्य होत असल्याचा आरोप कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. पूर्वी बेस्टचे अकाउंट आणि ऑडिट विभागाचे अधिकारी रोज येणाऱ्या रोखीच्या पैशाचे योग्य नियोजन करून प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी योग्य गुंतवणूक करत होते. त्यामुळे या पैशाचे व्याज बेस्टच्या तिजोरीत येत होते. पण गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांचे बेस्टच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रोखीच्या पैशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. येणारी रोजची रोख तशीच पडून आहे, असा आरोप सामंत यांनी केला आहे.
बँकाकडून कर्ज मिळेना
बेस्टच्या कामगारांना प्रत्येक महिन्याला अर्धा पगार प्रत्येकाच्या विभागात जाऊन घ्यावा लागत आहे. सर्वच कामगारांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही कामागारांना पगार घेण्यासाठी दुसऱ्या विभागात जावे लागत आहे. त्यामुळे वेळ वाया जात आहे. कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दर महिना रोखीत मिळणारा पगार बँकेत जमा करावा लागत आहे. तर काहींना या पद्धतीमुळे बँकेचे कर्ज मिळत नाही. भारत प्रगतीपथावर असताना बेस्ट उपक्रम परत पाठीमागे जात आहे. त्यामुळे या प्रकरणी लक्ष घालून अधिकाऱ्यांना योग्य सूचना करावी, अशी मागणी सुहास सामंत यांनी केली आहे.