मुंबई : बेस्ट उपक्रम पुन्हा एकदा निर्नायकी झाला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. श्रीनिवास यांनी फेब्रुवारी महिन्यात बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. धारावी पुनवर्सन प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी असलेल्या श्रीनिवास यांच्याकडे बेस्टची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. आधीच बेस्ट उपक्रमामध्ये येण्यास कोणीही अधिकारी उत्सूक नसताना आता हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.
बेस्ट उपक्रमाची कामगिरी गेल्या कित्येक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या खालावत चालली आहे. बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाची वाढत चाललेली तूट, कमी होत असलेला बसताफा, तसेच वाढत्या अपघातांच्या घटना यामुळे बेस्टची दुर्दशा झाली असून संचित तूट सहा हजार कोटींच्या पुढे गेली आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे. निवृत्त कामगारांची देणी द्यायला उपक्रमाकडे निधी नाही. या उपक्रमाला सक्षम नेतृत्वाची गरज असताना अधिकारी मात्र इथे यायला तयार नाहीत.
गेल्या वर्षी बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी असलेल्या अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्यानंतर हे पद तब्बल पंधरा दिवस रिक्त होते. त्यानंतर श्रीनिवास यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. मात्र धारावी पुनवर्सन प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असलेल्या श्रीनिवास यांना बेस्टची अतिरिक्त जबाबदारी दिली होती. मात्र श्रीनिवास हे बेस्टच्या मुख्यालयात बसून धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कामच अधिक करायचे अशीही चर्चा कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत होती. त्यामुळे बेस्टला शेवटपर्यंत पूर्णवेळ अधिकारी मिळू शकले नाही. पाच महिन्यांतच बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाची खुर्ची पुन्हा एकदा रिकामी झाली आहे.
नुकतेच उपमहाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आलेले डॉ. राजेंद्र पाटसुते हे देखील ३१ जुलै रोजी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रम सध्या एका चांगल्या अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. आधीच तोट्यात असलेल्या उपक्रमाकडे येण्यास अधिकारी तयार होत नाहीत. त्यातच आता कोणी नवीन अधिकारी आले तरी त्यांना बेस्ट उपक्रमाचा खर्च आणि महसुलाचा ताळमेळ जमवून उपक्रमाचा दैनंदिन खर्च भागवण्याचेच आव्हान पेलवावे लागणार आहे.
बेस्टचे तिकिटदर वाढवले
श्रीनिवास यांच्या काळात बेस्टचे तिकिट दर वाढण्याचा मोठा निर्णय मात्र घेण्यात आला. सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.