हलाम बोल.. हाएस बोल..

अत्यंत वजनदार असलेली ही केबल पुढे सरकविण्यासाठी १२५ कामगार आपली शक्ती पणाला लावत होते.

नरिमन पॉइंट येथील एलआयसी इमारत ते अदानी चौकपर्यंत ३३ हजार केव्ही क्षमतेची व २५० मीटर लांबीची मुख्य विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना.

दक्षिण मुंबई बेस्ट कामगारांच्या आरोळ्यांनी दुमदुमली; मुख्य विद्युत वाहिनी टाकण्याचे काम
हलाम बोल.. हाएस बोल.. अशा आरोळ्या दक्षिण मुंबईच्या एका परिसरात भोंग्यातून देण्यात येत होत्या. या आरोळीला खड्डय़ात उतरलेले सव्वाशे कामगार बेंबीच्या देठापासून ओरडून प्रतिसाद देत होते. ‘बेस्ट’ची २५० मीटरची वायर ओढण्याचे हे काम नरिमन पॉइंटमधील ‘कॉर्पोरेट’ भागात चालू असल्याने अनेक जण कोरडय़ा कुतूहलाने या कामाकडे बघत आपली वेगळी वाट धरून पुढे जात होते.
‘बेस्ट’कडून नरिमन पॉइंट भागातील एलआयसी इमारत ते अदानी चौकपर्यंत ३३ हजार केव्ही क्षमतेची व २५० मीटर लांबीची मुख्य विद्युत वाहिनी टाकण्याचे काम मंगळवारी सकाळी चालू होते. बॅक-बे रेक्लमेशन ते मरिन ड्राइव्ह या महत्त्वाच्या भागाला याच तारेमुळे विद्युतपुरवठा होणार असल्याने ‘बेस्ट’चे शिवडी कार्यालयातील अभियंते जातीने लक्ष देत होते.
अत्यंत वजनदार असलेली ही केबल पुढे सरकविण्यासाठी १२५ कामगार आपली शक्ती पणाला लावत होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन मुकादम हातात माईक घेऊन भोंग्याद्वारे ‘हलाम बोल’ अशी आरोळी ठोकत होते, तर या आरोळीला ‘हाएस बोल’ या आरोळीने प्रतिसाद देऊन हे कामगार केबल ओढत होते. या वेळी अरे काय टाइमपास करता.. लवकर ओढा.. जेवायला कमी वेळ राहणार आहे.. अशा आरोळ्या देऊन मुकादम घाई करत होते.
तर दिवसात अजून काही ठिकाणी एवढय़ाच लांबीच्या केबल ओढायच्या असल्याने व जेवायला कमी वेळ शिल्लक असल्याने कामगारही पोटतिडकीने ओरडून ताकद लावत होते. मुकादम ए. ए. राणे म्हणाले की, रात्र आणि दिवस पाळीत आम्ही हे काम करत असतो. अजून सात ठिकाणी करायचे असून येथला रस्ता नागमोडी असल्याने आज वेळ गेला.
मात्र या मेहनत घेणाऱ्यांकडे काहीशा तिरस्काराने व दुर्लक्ष करून नरिमन पॉइंट भागातील टापटीप माणसे आपल्या मार्गाने मार्गस्थ होत होती. त्यामुळे अपार कष्ट करून शहर रोषणाईत भर घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कामगारांकडे औत्सुक्याने बघण्याऐवजी दुर्लक्ष करणारेच अधिक असल्याचे चित्र दिसून आले. यातही कामगार आपसात विनोद करून वेळ पुढे ढकलताना दिसले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Best start main electrical line work from lic building to adani chowk

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या