मराठा समाजाच्या मोर्चातून शक्तिप्रदर्शन करण्याबरोबरच सरकारबरोबर चर्चेच्या माध्यमातूनही आता मार्ग काढावा आणि मागण्यांचा मसुदा तयार करून स्वतंत्र ‘मॉडेल’द्वारे मराठा समाजाच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यात यावे, असे मत राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यापेक्षा, कोणावरही अन्याय होणार नाही अशी पद्धत लागू करून त्रुटी दूर कराव्यात आणि कोणामध्येही असुरक्षिततेची भावना राहू नये, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाचे प्रचंड मूक मोर्चे निघत असल्याने सरकार धास्तावले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या नेत्यांशी चर्चेची भूमिका घेतली आहे. मोर्चाचे नेतृत्व समाजाकडून केले जात असून सर्वपक्षीय त्यात सामील असल्याने अजून ठोस मागण्या व चर्चेसाठी नेते पुढे आलेले नाहीत. पंडित श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा हे आध्यात्मिक गुरू भाजपबरोबर असताना भय्यू महाराज सरकारच्या विरोधात असल्याची व मोर्चाला पाठिंबा व मदत करीत असल्याची चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘मी सरकारवर नाराज नाही’ असे स्पष्ट प्रतिपादन करीत भय्यू महाराजांनी मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका व मते मांडली.
मराठा समाजातील काही वर्ग संपन्न असतानाही बराच मोठा वर्ग आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व विकासापासून वंचितच राहिला. वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबातील मुलींचे विवाह, ज्येष्ठांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, शेती व अन्य खर्च करण्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या. त्यातून कर्जे वाढली व शेतीतील प्रश्नांमुळे आत्महत्याही वाढल्या. बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा असंतोष कोपर्डी येथील दुर्दैवी बलात्कार प्रकरणापासून मूक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर येत आहे. सरकार लक्ष देत नसेल तर मोर्चे काढले जातात. पण समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेची तयारी दाखविली आहे. त्यामुळे समाजातील नेत्यांनी मागण्यांबाबतचा मसुदा तयार करून सरकारशी चर्चा करावी. समाजातील शेतकरी, युवक, महिला, ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न, कर्जे अशा विविध मुद्दय़ांवर सर्वागीण मार्ग काढणारे ‘मॉडेल’ तयार व्हावे
‘युगंधरा’ मार्ग दाखवेल
कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेनंतर समाज एकत्र आला असून तिच्यासाठी ‘युगंधरा’ संबोधन वापरून प्रश्न सोडविले जावेत, अशी अपेक्षा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली.