उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया करावी लागणार असल्याने भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक ३० जूनऐवजी ४ जुलै रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले.
भंडार जिल्हा परिषदेच्या ५२ जागा तसेच जिल्ह्यातील सात पंचायतीच्या निवडणुकांचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १६ तारखेला अधिसूचना जारी केली जाईल. २० जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ४ तारखेला मतदान तर ६ तारखेला मतमोजणी होईल. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असून, न्यायालयाच्या आदेशामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक ३० जूनलाच होईल.
काँग्रेसची नावे निश्चित
गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार गोपाळ अगरवाल, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये आदी उपस्थित होते. काँग्रेस या निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढणार आहे.