मुंबई: देशभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवेतील ओला, उबर कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात प्रथमच सहकारी तत्वावर ‘भारत टॅक्सी ’ सुरु करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली असून पहिल्या टप्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकार विकास निगममधील सूत्रांनी दिली.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार धोरणाची घोषणा करताना सहकारमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर पूर्वी देशात सहकारी तत्वावर ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार भारत ही ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरु केली जाणार आहे. सहकार विभागाच्या पुढाकाराने ही योजना आखली जात आहे. यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ(एनसीडीसी), भारतीय कृषी फर्टिलायझर सह लि.(ईफको), गुजरात सहकारी दुग्ध विकास संस्था अशा आठ सहकारी संस्थाच्या सहभागातून बहुराज्य सहकारी टॅक्सी संस्थेची नोंदणी करण्यात आली असून त्यासाठी ३०० कोटींचे भांडवल उभारण्यात आले आहे.

भारतीय कृषक सहकारी संस्था(कृभको), राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(नाबार्ड), राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ(एनडीडीबी) आणि राष्ट्रीय सहकार निर्यात लि.याही संस्था सहकारी टॅक्सी संस्थेच्या भागधारक असून यात सरकारचा थेट सहभाग नसेल. या सर्व संस्था सहकारी तत्वावर ही टॅक्सीसेवा टप्या टप्याने देशभरात सुरु करणार आहेत.

पहिल्या टप्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात भारत टॅक्सीची सेवा सुरु केली जाणार असून त्यासाठी आतापर्यंत २०० टॅक्सी चालकांची नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेची शास्त्रोक्त आखणी करण्याटी जबाबादरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) बेंगळुरू यांच्यावर सोपविण्यात आली असून ॲप निर्मितीसाठी म्हणजेच तांत्रिक भागिदारासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ओला, उबेर सारख्या कंपन्यांकडून टॅक्सीचालकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखतांनाच त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देताना सामान्य प्रवाशांनाही किफारतशीर दरात टॅक्सीची सुविधा उपलपब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली जात असल्याची माहिती राष्ट्रीय सहकार विकास महामंडळातील सूत्रांनी दिली.

भारत टॅक्सीचा दुहेरी फायदा भारत टॅक्सीमुळे देशभरातील प्रवासी आणि टॅक्सीचालकांना फायदा होणार आहे. ही सेवा ओला, उबेरप्रमाणे ॲप आधारित असली तर त्यात प्रवासी वा टॅक्सी चालक यांची पिळवणूक होणार नाही, उलट टॅक्सीचालकांना चार पैसे जादा मिळतील आणि लोकांचेही पैसे वाचतील. ही सहकारी तत्वावरील योजना असल्याने संस्थेच्या संचालक मंडळात टॅक्सीचालकांचे प्रतिनिधी असतील. या योजनेती तयारी सुरु असून कर्मचारी भरती,टॅक्सी चालकांची नोंदणी सुरु झाली आहे. – रोहित गुप्ता, उप व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ(एनसीडीसी)