मुंबई : मढ आणि मार्वे या दोन पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या भास्कर भोपी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. आक्सा, एरंगळ, दानापानी या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना जोडणारा हा रस्ता चौपट रुंद करण्यात येणार आहे.

पश्चिम उपनगरातील मालाड येथील भास्कर भोपी मार्ग मार्वे रोडवरील टी जंक्शनवरून (आयएनएस हमला) मढ जेट्टीकडे जातो. हा रस्ता आक्सा, एरंगळ बीच, दाना पानी या समुद्रकिनाऱ्यांना जोडतो. या रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम महापालिकेच्या पी उत्तर विभागाने हाती घेतले आहे.

हेही वाचा…‘टीस’च्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा; टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद

सध्या या रस्त्याची रुंदी विविध ठिकाणी ६ ते ८ मीटर आहे. या मार्गावर पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणावर ये – जा करीत असतात. ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता असते. आता पी/उत्तर विभागाने भास्कर भोपी मार्गाचे (टी-जंक्शन, मार्वे ते मढ जेट्टी) रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. २०३४ च्या विकास आराखद्यानुसार या रस्त्याचे २७.४५ मीटर रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता चौपट रुंद होणार आहे.

वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेतला गेला आहे. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्रांचे निर्मूलन होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी पालिका प्रशासनाला अपेक्षा आहे. तसेच, विस्तारित रस्ता भविष्यात मढ-वर्सोवा पुलाशी जोडला जाईल, ज्यामुळे मालाड ते अंधेरी प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल.

हेही वाचा…आदित्य ठाकरे महिनाभरात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार, या प्रकल्पामुळे एकूण ५२९ बांधकामे व ४२० भूखंड बाधित होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, सध्या पहिल्या टप्प्यात ३७ बांधकामे व ३१ मोकळ्या भूखंडांसाठी नोटिसा पाठवल्या जात आहेत आणि इतरांना पुढील टप्प्यांमध्ये नोटिसा पाठवल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.