लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज काही लोक स्ट्राईक रेटच्या गोष्टी करत आहे. त्यांच्याकडून काहीही आकडे सांगितले जात आहेत. बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने त्यांचा आणि आकडे लावण्याचा जवळचा संबंध आहे, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ठाकरे गटाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली.

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

“लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने दिल्लीश्वरांचा माज उतरवला आहे. त्यांना सत्तेचा माज चढला होता. त्यांनी सांगितलं की यावेळी त्यांना ४०० पेक्षा जास्त जागा मिळेल. ४०० पारचा नारा देऊन त्यांनी देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देश शांतता होती. कोणी भाजपाविरोधात बोलायला तयार नव्हतं. तेव्हा या दहशतीविरोधात उद्धव ठाकरेंनी आवाज उठवला होता. ‘इसबार ४०० पार नही’, तर ‘इसबार तडीपार’ असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला होता, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना तडीपार करून दाखवलं”, असं भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खुळखुळा केला, मोदी आता ब्रांड नव्हे ब्रँडी म्हणूनच भाजपाचे लोक..”, संजय राऊतांची टोलेबाजी

नाव न घेता फडणवीसांवर टीका

पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. “काही लोक आज स्ट्राईकरेटच्या गोष्टी करत आहेत. त्यांच्याकडून काहीही आकडे सांगितले जात आहेत. खरं तर बऱ्याच वर्षांपासून त्याच्यांकडे गृहखातं असल्याने त्यांचा आकडे लावण्याचा जवळचा संबंध आहे”, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने आमच्या स्ट्राईक रेटच्या नादी लागू नये

“आज त्यांनी स्ट्राईक रेटच्या गोष्टी करू नये. २३ खासदार असतानाही या निवडणुकीत त्यांचे १७ खासदार निवडून आले. तर इंडिया आघाडीचे ३० खासदार निवडून आले. हा उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे. त्यांनी आमचे १३ खासदार चोरून नेले, तेव्हा आमच्याकडे ५ खासदार राहिले. मात्र, त्या पाच खासदारांचे ९ खासदार उद्धव ठाकरेंनी करून दाखवले. त्यामुळे आमचा २०० चा स्ट्राईक रेट आहे. भाजपाने आमच्या स्ट्राईक रेटच्या नादी लागू नये, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे”, असंही भास्कर जाधव म्हणाले.