भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत असतानाच भीम आर्मीनं आज दादर स्थानक परिसरामध्ये आंदोलन केलं. दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत आंदोलकांनी दादर स्थानकावरील ब्रीजवर घोषणाबाजी केल्याचं पहायला मिळालं.

महापरिनिर्वाण दिनी अनेकजण राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात तेव्हा ते दादर स्थानकामध्येच उतरतात. त्यामुळेच या स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मीने आंदोलन करुन ही मागणी पुन्हा केल्याचं पहायला मिळालं.

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आधी दादर स्थानकासमोर आंदोलन केलं. त्यानंतर ‘जय भीम, जय भीम’, ‘ नामांतरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे’, ‘होतं कसं नाय झालंच पाहिजे’ अशा घोषणा देत भीम आर्मीचे कार्यकर्ते दादर स्थानकामध्ये शिरले. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना विरोध केला. मात्र परिस्थिती चिघळू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलकांना दादरस्थानकावरील ब्रिजवरुन घोषणाबाजी करत चालत जाण्यासाठी परवानगी दिली. आंदोलकांनी पोलीस बंदोबस्तामध्येच हातात नामांतरणाच्या मागणीचे पोस्टर्स पकडून घोषणाबाजी करत नामांकरण तातडीने करण्यासंदर्भातील पावले उचलावीत अशी मागणी केली.