मुंबई : भरधाव वेगात धावणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी झाले. चेंबूर परिसरात गुरुवारी रात्री हा अपघात झाला असून टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
हसरतअली शहा (३६) असे जखमी तरुणाचे नाव असून तो घाटकोपरच्या आझाद नगर परिसरातील रहिवासी आहे. काही कामानिमित्त तो गुरुवारी रात्री चेंबूर नाका परिसरात आला होता. त्यानंतर रात्री १०३.० च्या सुमार तो पुन्हा घाटकोपरच्या दिशेने जात होता. यावेळी अमर महल जंक्शन परिसरात त्याला पाठीमागून आलेल्या एका डंपरने जोरदार धडक दिली. त्यामुळे हसरतअली खाली कोसळला. याच वेळी डंपर त्याच्या दोन्ही पायावरून गेल्या. या अपघातात त्याच्या पायांना गंभीर इजा झाली.
स्थानिक रहिवाशांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ या तरुणाला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत टिळक नगर पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.