मुंबई…म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारित असलेल्या संक्रमण शिबिरातील शिबिरार्थींच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला १० मार्चपासून सुरुवात झाली असून आतापर्यंत ११ हजार ५०० गाळेधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता अंदाजे ८ हजार शिबिरार्थींचे सर्वेक्षण बाकी आहे. हे सर्वेक्षण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे नियोजन दुरुस्ती मंडळाचे आहे. हे सर्वेक्षण पूर्ण करून पात्र-अपात्र शिबिरार्थींच्या याद्या अंतिम करून ही माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आणि राज्य सरकारच्या अंतिम निर्णयानुसार अपात्र (घुसखोर) ठरलेल्यांविरोधात योग्य ती कारवाई दुरुस्ती मंडळाकडून केली जाणार आहे.

बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा निर्णय

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकरप्राप्त इमारतींतील मूळ रहिवाशांना दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये स्थलांतरीत केले जाते. मूळ रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर त्यांना पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा दिला जातो. असे असताना म्हाडाच्या सर्व संक्रमण शिबिरात मूळ रहिवाशांऐवजी घुसखोर, अपात्र रहिवाशीही मोठ्या संख्येत राहत आहेत.

घुसखोरांना रोखण्यासाठी मंडळाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. पण घुसखोरी रोखण्यात मंडळाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे घुसखोरांचा प्रश्न मंडळासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. या घुसखोरांकडून मूळ रहिवाशांसाठीच्या बृहतसूचीवरील घरेही लाटली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने घुसखोरांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी घुसखोरांना, अपात्र रहिवाशांना बांधकाम शुल्क आणि इतर शुल्क मोजावे लागणार आहे. तेव्हा राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दुरुस्ती मंडळाने संक्रमण शिबिरातील २० हजार गाळ्यातील रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अनेक कारणाने बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात झाली नव्हती. अखेर मार्च २०२५ मध्ये प्रत्यक्षात बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे.

वर्गवारी निश्चित करणार दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहिती १० मार्च ते ३० एप्रिलदरम्यान ११ हजार ५०० गाळ्यांमधील गाळेधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षानगर, धारावी, मालवणी, मालाड, सहकार नगर, कन्नमवारनगर, बिंबिसार नगर,गोराई यांसह अन्य ठिकाणच्या संक्रमण शिबिरातील गाळेधारकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

एकीकडे सर्वेक्षण सुरु असून दुसरीकडे गाळेधारकांची अ,ब आणि क अशी वर्गवारी करण्याचीही कामे सुरु आहेत. अ मध्ये मूळ भाडेकरु, ब मध्ये खरेदी-विक्री व्यवहारर केलेले रहिवाशी तर क मध्ये घुसखोरांचा समावेश असणार आहेत. २० हजार गाळेधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्गवारी अंतिम करून गाळेधारकांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्यानंतर न्यायालायच्या आणि राज्य सरकारच्या अंतिम निर्णयानुसार क वर्गातील घुसखोरांविरोधात योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम आकारून त्यांना अधिकृत केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून सर्वेक्षणाअंती नेमके किती घुसखोर संक्रमण शिबिरात आहेत याची निश्चित संख्या समोर येणार आहे.