मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने फेब्रुवारीपासून संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असताना अद्यापही अंदाजे तीन हजार संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण होणे शिल्लक आहे. संक्रमण शिबिरार्थी कधी घरी नसल्याने, त्यांची कागदपत्रे अपुरी असल्याने वा इतर कारणाने बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे अशा अंदाजे तीन हजार संक्रमण शिबिरार्थींना आता शेवटची संधी देण्याचा निर्णय दुरुस्ती मंडळाने घेतला आहे.

त्यानुसार लवकरच या रहिवाशांकडे दुरुस्ती मंडळाचे पथक जाणार असून त्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण न झालेल्या संक्रमण शिबिरार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन दुरुस्ती मंडळाने केले आहे.

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकरप्राप्त इमारतीमधील मूळ रहिवाशांना मंडळाकडून म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते. असे असताना मूळ भाडेकरुंच्या संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून घुसखोरी रोखण्यात मंडळाला यश आलेले नाही. परिणामी, घुसखोरांचा प्रश्न मंडळासाठी डोकेदुखी बनला आहे.

घुसखोरांकडून मूळ भाडेकरुंसाठीची बृहतसूचीवरील घरे लाटण्याचेही प्रकरणे समोर आली आहेत. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने घुसखोरांकडून बांधकाम शुल्क आणि इतर शुल्क अदा करून घेत त्यांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणी अद्याप काही कारणाने झालेली नाही. पण ती लवकरच होण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने संक्रमण शिबिरार्थींचे वर्गीकरण करणे गरेजेचे आहे. या वर्गीकरणासाठी मंडळाने बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला. मात्र बायोमेट्रीक सर्वेक्षणास प्रत्यक्ष सुरुवात होण्यास फेब्रुवारी २०२५ उजाडले.

फेब्रुवारीपासून बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात झाली. त्यानुसार आतापर्यंत १७ हजार शिबिरार्थींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजे तीन हजार संक्रमण शिबिरार्थींचे सर्वेक्षण शिल्लक असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अनेकदा संक्रमण शिबिरार्थी घरी नसल्याने, कागदपत्रे अपुरी असल्याने वा इतर कारणांमुळे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता अशा संक्रमण शिबिरार्थींना शेवटची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे या रहिवाशांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन दुरुस्ती मंडळाने केले आहे.

अन्यथा घुसखोर ठरविले जाणार ?

दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आलेल्या शेवटच्या संधीचा लाभ न घेणाऱ्या, सर्वेक्षणात सहभागी न होणाऱ्या संक्रमण शिबिरार्थींना सर्वेक्षणास, संक्रमण शिबिरात वास्तव्यास राहण्यास स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांना घुसखोर घोषित करण्यात येणार असल्याचे दुरुस्ती मंडळाने स्पष्ट केल. त्यामुळे या शेवटच्या संधीचा लाभ घेत बायोमेट्रीक सर्वेक्षण करून घेणे या शिबिरार्थींसाठी आवश्यक असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासाठी सर्वेक्षण

बायोमेट्रीक सर्वेक्षणाअंतर्गत अ, ब आणि क असे संक्रमण शिबिरार्थींचे वर्गीकरण केले जाणार आहे. अ मध्ये मूळ भाडेकरू, ब मध्ये खरेदी-विक्री व्यवहार करणारे आणि क मध्ये घुसखोरांचा समावेश असणार आहे. २० हजार संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करून वर्गवारीनुसार संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढे न्यायालय आणि राज्य सरकारच्या अंतिम निर्णयानुसार घुसखोरांविरोधातील कार्यवाही केली जाणार असल्याचेही दुरुस्ती मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.