वेलिंगकर यांचा दावा; ‘गोवा संघा’ला अन्य राज्यांतील संघ पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

भाजपविरोधात संघात अनेक राज्यांमध्ये असंतोष खदखदत असून केवळ मी तो व्यक्त केला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील बंडखोर सुभाष वेिलगकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. विदर्भ, राजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून मला पाठिंबा दर्शविणारे दूरध्वनी आल्याचेही वेलिंगकर यांनी सांगितले.

संघातून बंडखोरी करून गोव्यात भाजपच्या पराभवासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांची आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वेलिंगकर यांनी भाजपच्या कारभाराविरोधात अनेक राज्यांमध्ये संघ पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे स्पष्ट केले.

हे पदाधिकारी आपल्याप्रमाणे ती जाहीरपणे व्यक्त करणार नाहीत, असेही वेिलगकर म्हणाले. ज्या पदाधिकाऱ्यांनी अन्य राज्यांमधून पाठिंबा दर्शविला आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्या राज्यांमध्ये जाऊन भूमिका मांडणार का, असे विचारता वेिलगकर यांनी त्यास नकार दिला. मी केवळ गोव्यात भाजपच्या पराभवासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

काँग्रेसची सत्ता उलथवून टाकून देशात सत्तापरिवर्तनासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व शक्ती पणाला लावून काम केले. मात्र केंद्र सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात संघ पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद असल्याचा वेिलगकर यांचा दावा खरा असेल, तर भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

मातृभाषेला प्राधान्य दिले गेलेच पाहिेजे, ही गोव्यातील जनतेची भावना आहे. त्यामुळे मी घेतलेल्या बैठकीला दोन हजार कार्यकर्ते हजर होते. तर नवीन संघ प्रांतचालकांच्या बैठकीसाठी विजय पुराणिक व अन्य ज्येष्ठ पदाधिकारी येऊनही मोजक्याच व्यक्ती उपस्थित होत्या, असे वेिलगकर यांनी स्पष्ट केले.

वेलिंगकर उवाच..

  • भाजपच्या कारभाराविरोधात अनेक राज्यांमध्ये संघ पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
  • मी केवळ गोव्यात भाजपच्या पराभवासाठी काम करणार
  • पूर्वी संघाच्या सांगण्यानुसार भाजप नेते वागत होते आणि आता उलट परिस्थिती आहे.
  • पर्रिकरांच्या मर्जीवर सर्व चालत असून भाजपच्या सांगण्यानुसार सर्व काही होत आहे.

अन्य राज्यांमधील व गोव्यातील परिस्थिती वेगळी आहे. गोव्याने पोर्तुगीजांच्या राजवटीचे दुष्परिणाम सहन केले. पण तरीही संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अराष्ट्रीयत्व पसरविण्याचे काम केले. गेली ५५ वर्षे विरोध करूनही आर्च बिशप यांच्याशी संधान बांधून पोर्तुगीज महोत्सव, विमानतळाचे नामकरण व अन्य अनेक निर्णय त्यांनी घेतले.’

– सुभाष वेलिंगकर