भाजपा नेते आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव न घेता सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे ‘पृथ्वीअस्त्र’ भयभीत होऊन पळाले असा टोला लगावला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे. भाजपाचे सारे विरोधक गारद झाले असंही त्यांनी म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी ही टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जय जय महाराष्ट्र माझा…गर्जा महाराष्ट्र माझा! उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा! सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले. भाजपचे विरोधक सारे गारद झाले”.

विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणुकदेखील पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या उदयनराजेंविरोधात काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवणार अशी चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पृथ्वीराज यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याचे सांगितले जात होतं. पण तसं झालेलं नसून पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केले. त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज, दोन विद्यमान आमदारांसह ५२ उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी रात्री जाहिर केली. काँग्रेसच्या पहिल्या यादीत ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पक्षाच्या वाटय़ाला १३५ जागा येणार असून ऊर्वरित ३० पेक्षा जास्त उमेदवारांची यादी बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.