अनिल परब यांच्या संभाषणाची सीबीआय चौकशी करा

राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्या असून राज्य सरकारविषयीचा असंतोष प्रकट होऊ लागला आहे.

आशीष शेलार यांची मागणी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत असल्याची व न्यायालयाबाबत विधाने असल्याची दूरध्वनी संभाषणाची ध्वनिफीत उघड झाली असून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाबाबत चुकीचा उल्लेख केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माफी मागणार का, असा सवाल करीत त्यांचे अज्ञान उघड झाल्यानेच मंगळवारी थयथयाट करण्यात आल्याचा आरोपही के ला.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी बैठकीत असताना एका आयपीएस अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून राणे यांना अटक करण्यासंदर्भात आदेश देत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाली आहे. यावेळी परब हे उच्च न्यायालयाने व सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे सांगत आहेत. त्यावेळी राणे यांनी जामीन अर्ज केलेला नव्हता. त्यामुळे याबाबतची विधाने न्यायालयाचा अपमान आहे. गृहमंत्री नसतानाही परब यांनी राणे यांच्या अटकेसाठी आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचेही या संवादातून दिसत आहे. न्याय प्रक्रिया व गृहखात्यातील हस्तक्षेप संशयास्पद असून या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्या असून राज्य सरकारविषयीचा असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राणे यांना अटक व त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशय शेलार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री अमृतमहोत्सव विसरले आहेत. यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना ७५ हजार स्मरणपत्रे पाठवितील, असेही शेलार यांनी सांगितले.

शिवसेना संकुचित का

तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवारांना एका व्यक्तीने कानशिलात मारण्याची दुर्दैवी घटना घडली. पण त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केले. अशा संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहत आहे, असा सवाल करीत ‘सुरुवात तुम्ही केलीत, शेवट आम्ही करू,’ असा इशारा शेलार यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp ashish shelar demand cbi probe of anil parab s conversation zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या