मान्सून एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधा उडाली आहे. रात्रीपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरही पाणी आलं असून लोकलवसेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान यावरुन विरोधकांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी तर सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल असा टोला लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अतुल भातखळकर यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच इतर भाजपा नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पावसाचं धुमशान, मुंबई तुंबली! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेला ‘ब्रेक’

पावसाळ्यातील पालिकेच्या नियोजनाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा म्हणतील. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे”. “मुंबईच्या आयुक्तांनी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना भ्रष्टाचार कमी करुन आता तरी नालेसफाई नीट करा आणि पाणी साचण्याच्या जागा आहेत तेथील कामं पूर्ण करावीत असं सांगू,” असंही ते म्हणाले आहेत.

मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता – किशोरी पेडणेकर
मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार..पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला आहे.”