एकनाथ खडसे, विनोद तावडे, बावनकुळे, मेहता यांच्याविषयी चर्चेला ऊत    

मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे आदींना भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या काही कारणांमागे गेल्या काही वर्षांत त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे एक महत्त्वाचे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना तोंड देण्यासाठी पक्षाची प्रतिमा उजळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र भाजपने उशिरा का होईना, भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई केली आणि जे नेते अजूनही निवडणूक रिंगणात आहेत, त्यांना जनताच धडा शिकवेल, असे टीकास्त्र विरोधकांनी सोडले आहे.

भाजप विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे आणि विनोद तावडे हे विरोधी पक्षनेते होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात लढताना त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. तसेच २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी २५ वर्षांची युती तोडण्याची घोषणा ज्येष्ठ नेते या नात्याने खडसे यांनी केली होती. शिवसेनेवर तोफ डागण्याचे काम खडसे यांनी केले होते. सत्ता आल्यावर ज्येष्ठ असल्याने खडसे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षा पल्लवित झाल्या. पण ते न मिळाल्याने त्यांची नाराजी वाढत गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुप्त संघर्ष सुरू झाला. पुण्यातील भोसरी येथे कुटुंबीयांच्या नावे एमआयडीसीच्या संपादनातील वादग्रस्त जमीन खरेदी केल्याने खडसे यांना महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर खडसे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली.

खडसे, तावडे, बावनकुळे, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे यांच्यासह अनेक मंत्र्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. काही मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीनचीट दिली, तर काहींना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कार्यक्षमतेचा ठपका ठेवून वगळले. निवडणुकीला सामोरे जाताना आणखी काही नेत्यांना उमेदवारी नाकारल्याने त्याची नेमकी कारणे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारणे न सांगता उमेदवारी न दिलेल्या नेत्यांना अन्य जबाबदाऱ्या दिल्या जातील, अशी सारवासारव केली आहे.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, विरोधकांनी २१ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याऐवजी त्यांना क्लीनचीट दिली. जनतेसमोर जाताना अडचण होऊ नये म्हणून आता कारवाई केली आहे. आता जनताच भ्रष्टाचारी नेत्यांना घरी पाठवेल.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या नेत्यांना उमेदवारी नाकारण्याची कारणे भाजपने जनतेला सांगावीत, अशी मागणी केली. विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर क्लीनचीट देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना कार्यक्षम ठरविले, मग आता तिकिटे का दिली नाहीत, असा सवाल सावंत यांनी केला.