भाजप श्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनी सबुरीचा सल्ला दिल्याने आक्रमकपणे मैदानात उतरलेल्या मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सोमवारी तलवार म्यान केली आहे. अ‍ॅड. शेलार, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्याविरोधात ‘मनोरुग्ण’ आणि अन्य शेलक्या विशेषणे वापरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ‘सामना’मध्ये बरे छापले गेल्याने शेलार माघारी वळले आहेत.

पंतप्रधान मोदी, अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले किंवा लिखाण केले, तर त्याला आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचे अ‍ॅड. शेलार यांनी ठरविले आहे. पक्षाच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, अशी त्यांची भूमिका असून वैयक्तिक टीकाटिप्पणीकडे दुर्लक्ष केले जाणार आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपच्या ‘मनोगत’विरोधात आंदोलन व अंकाची होळी केल्यानंतर त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची भाषा करूनही अ‍ॅड. शेलार यांनी आता थंड राहण्याची भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सबुरीची भाषा केली तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘मनोगत’मधील लेख हा भांडारी यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्यांना सबुरीचा सल्ला देऊन तोंडघशी का पाडले, याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार असल्याने त्यांनी कितीही टीका केली, तरी वाद टाळावा आणि आक्रमक प्रत्युत्तर देऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली असल्याचे समजते. मुंबईत शिवसेना किंवा ‘सामना’विरोधात आंदोलन केले, तर त्याचे राजकीय पडसाद उमटतील व शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. दरम्यान, मी शिवसेनेचा नेता असल्याने पक्षाचीच भूमिका मांडत असतो आणि लिखाण करतो, असे खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.