शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेऊन शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लक्ष्य करत त्यांचे फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशारा दिला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेत्यांकडूनही उत्तरं दिली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे –

मुंबईचे लचके तोडण्यासाठी आज गिधाडे फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे. ‘‘त्यावेळी आदिलशहा आणि अनेक जण आले. आता अमित शाहदेखील नुकतेच येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. पण कितीही जण आले, तरी आपण घाबरण्याचे कारण नाही. आपण लढायचे,’’ असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

गौतम अदानींनी ‘मातोश्री’वर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

मेळाव्याची रंगीत तालीम: महिनाभरात निवडणुका घ्या! – उद्धव ठाकरे यांचे भाजपला थेट आव्हान

हिंदू-मुस्लिम किंवा मराठी-अमराठी असे फोडाफोडीचे डावपेच आखले तरी ते येथे यशस्वी होणार नाहीत. शिवसेनेने आतापर्यंत आणि करोनाकाळातही हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांसाठी आणि अमराठींसाठीही काम आणि मदतकार्य केलं आहे. त्यामुळे मुस्लिम, गुजराती, उत्तर भारतीय आणि सर्वच समाजघटकातील बांधव शिवसेनेबरोबर आहेत, असे ठाकरे म्हणाले.

भाजपाकडून टीका –

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं असून अमित शाह हे गरुड आहेत असं म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

“पेंग्विन सेनाप्रमुखांनी काल पुन्हा आपले पोकळ दंड पसरून त्याच गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले. त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक त्यांना कळत नाहीये. अमित शाह हे गरुड आहेत. किमान तेवढा तरी फरक पहा,” असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी महिनाभरात निवडणुका घेण्याचे आव्हान देत भाजपासह शिंदे गटाला लक्ष्य केल्यानंतर, त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मतदारच धडा शिकवतील, असं त्यांनी ठणकावलं. दसरा मेळाव्यावरून संघर्ष सुरू असलेल्या या दोन्ही गटांमध्ये बुधवारी या मेळाव्याची रंगीत तालीम रंगल्याचे चित्र दिसलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp keshav upadhye on shivsena uddhav thackeray amit shah sgy
First published on: 22-09-2022 at 10:54 IST