राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे सत्य असल्याचे म्हटले होत. दरम्यान, यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शरद पवारांनी भाजपा समर्थनाच्या प्रस्तावाला कधीच मंजुरी दिली नाही, असेही प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले महेश तपासे?
“शरद पवारांनी भाजपा समर्थनाच्या प्रस्तावाला कधीच मंजुरी दिली नाही. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय कोणी घेतला असेल, तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि इतर नेत्यांनी घेतला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता”, असं स्पष्टीकरण महेश तपासे यांनी दिलं.
“शरद पवारांचं नाव घेऊन खोटे आरोप लावण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे नेते भाजपाबरोबर गेले, त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या विचारांना तिलांजली देऊन हे नेते भाजपासोबत गेले. हे सर्व जनतेसमोर आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
प्रफुल्ल पटेल यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
“जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. २ जुलै रोजी अजित पवार आणि आमच्या काही नेत्यांनी या सरकामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५ आणि १६ जुलै अशा दोन वेळा आम्ही मुंबईत शरद पवार यांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली. साहेब जे झाले ते झाले. तुम्ही आमच्या निर्णयाबरोबर येण्याचे पसंत केले नाही. पण आमची तुम्हाला विंनती आहे की, तुम्ही आमच्याबरोबर या. कारण आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. त्यामुळे प्रयत्न करण्याच्याबाबतीत आम्ही काही कमी केली नाही. त्यानंतर पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यामुळे यामधून असे संकेत दिसत होते की, आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती आणि ते (शरद पवार) ५० टक्के तयार होते”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला होता.