मुंबई : सामाजिक एकता, बंधुता आणि समरसतेची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळख मिळाली आहे. याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी नुकतीच घोषणा केली. गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, असे त्यांनी घोषित केले. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शासनाच्या निर्णयाचे गणेशभक्तांकडून स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या उत्सवाला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून सर्व गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्राचा गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून भाजप आमदार हेमंत रासणे यांनी अधिवेशनात गणेशोत्सवासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले होते. सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. तसेच, गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. मात्र, आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. त्यामुळे आता हा सण महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध द्यावा, अशी मागणी रासणे यांनी केली होती.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये गणेशोत्सव सुरू केला. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव साजरा होत होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील, असेही त्यांनी म्हटले. पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
समन्वय समितीकडून निर्णयाचे स्वागत
या घोषणेमुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. शासनाची ही घोषणा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. तसेच या उत्सवासाठी शासनाने जास्ती जास्त निधी खर्च करण्याची तयारी दर्शवल्याने बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान जपले आहे. शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अडीअडचणी तातडीने सोडवल्या जातील, असा विश्वास बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केला आहे.